सोलापूर : खरे नौटंकी हे विनायक राऊतच : मनीष काळजे | पुढारी

सोलापूर : खरे नौटंकी हे विनायक राऊतच : मनीष काळजे

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सगळ्या जनतेने पाहिले आहे की खरे नौटंकी हे खा. संजय राऊत हेच आहेत. सांगोला दौर्‍यावर आलेले खा. विनायक राऊत हे त्या राऊतांचे चेले आहेत. जिल्ह्यातील मॅनेज शिवसेना त्यांच्यासोबत आहे. मात्र, खरी शिवसेना ही आमच्याबरोबरच असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मनीष काळजे यांनी दै. ‘पुढारी’ शी बोलताना केले.

खा. विनायक राऊत यांनी रविवारी सांगोला येथे आमदार शहाजी पाटील यांच्या मतदारसंघात येऊन सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी आमदार पाटील व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. आमदार पाटील हे नौटंकी करतात असा आरोप खा. राऊत यांनी केला होता त्याविषयी काळजे यांनी आपले मत व्यक्त केले. निवडून येणारे खरे शिवसैनिक 2 आमच्यासोबत आहेत. महापालिकेतील 21 नगरसेवकांपैकी किती नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत. याबाबत त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

लोकांमध्ये असलेले नगरसेवक त्यांच्यासोबत नाहीत. मात्र, मॅनेज पदाधिकारी त्यांच्यासोबत असल्याचेही काळजे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत खरी शिवसेनाच शिल्लक राहिली नाही. बहुमताचा विचार केल्यास आमची शिवसेनाच खरी आहे. आरोग्यमंत्री सावंत व आमदार पाटील हे जनतेतून निवडून आले आहे. मात्र, खा. राऊत यांच्यासोबत असलेले पदाधिकारी कधी जनतेतून निवडून आले आहेत का याचेही आत्मपरीक्षण त्यांनी करण्याची गरज आहे. या सर्व पदाधिकार्‍यांनी आयत्या पिठावर रेगोट्या ओढल्या आहेत. सांगोला येथील सभेला गर्दी करण्यासाठी तडीपार झालेल्या व्यक्तीला सोबत घेण्याची नामुष्की त्यांंच्यावर आली आहे. त्यांना एवढे वाईट दिवस येतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. सभेसाठी त्यांना जुने शिवसैनिक मिळाले नाहीत. नौटंकी करणारे राऊत संपूर्ण राज्याने पाहिले आहेत. केवळ त्यांच्या नौटंकीमुळेच त्यांनी शिवसेना संपविली असाही आरोप काळजे यांनी केला.

दोन-तीन दिवसांत पदाधिकारी निवडी
जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या निवडी दोन-तीन दिवसात केल्या जाणार आहेत. शिवसेनेची पदाधिकारी निवडीची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने या निवडी केल्या जातील. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न श्रेष्ठी करतील अशी अपेक्षा आहे.

प्रवेशाचे सत्र सुरूच राहील
शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचे सत्र सुरुच राहणार आहे. मागील दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या जवळपास 30 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भविष्यातही हे सत्र असेच सुरु राहील. बड्या नेत्यांच्या प्रवेशाबाबत श्रेष्ठी निर्णय घेतील असेही श्री. काळजे यांनी सांगितले.

Back to top button