थकीत एफआरपीसाठी इंद्रेश्‍वर साखर कारखान्याला ठोकले टाळे | पुढारी

थकीत एफआरपीसाठी इंद्रेश्‍वर साखर कारखान्याला ठोकले टाळे

बार्शी : पुढारी वृत्तसेवा : जानेवारी महिन्यापासून शेतकर्‍यांना एफआरपीतील एक रुपयाही न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी बार्शी तालुक्यातील इंद्रेश्‍वर साखर कारखान्याच्या गेटला टाळे ठोकले. तासभर बार्शी, परंडा, माढा या तीन तालुक्यांतील शेतकर्‍यांनी गेटसमोर ठिय्या मांडला. 30 ऑगस्टला सर्व शेतकर्‍यांचे पैसे देणार असल्याचे आश्‍वासन कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. एस. जाधव यांनी दिले.

इंद्रेश्‍वर साखर कारखान्याने माढा, बार्शी, परंडा याठिकाणच्या अधिकतर शेतकर्‍यांचा ऊस गाळप केला. ऊस गाळपास नेल्यानंतर चौदा दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असतानाही जानेवारीपासून शेतकर्‍यांना एफआरपीपोटी एक दमडीही दिली नाही. गेली अनेक महिने शेतकर्‍यांनी कारखान्याची पायरी झिजवली मात्र प्रत्येक वेळी कारखान्याने टोलवाटोलवी केली. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना प्रशासनाला निवेदन दिले होते. 21 ऑगस्ट पर्यंतपैसे न मिळाल्यास 22 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता.

त्याअनुषंगाने सोमवारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह तीन तालुक्यातील शेतकर्‍यांचा जथ्था कारखाना गेटसमोर जाऊन धडकला. पोलिस बंदोबस्त असतानाही शेतकर्‍यांनी गेटला टाळे ठोकले. तासभर शेतकर्‍यांनी घोषणाबाजी करीत गेटसमोर ठिय्या मांडला. कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. एस. जाधव यांनी आंदोलकांसमोर येऊन 30 ऑगस्ट पर्यंत सर्व शेतकर्‍यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील असे सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सध्या जे शेतकरी उपस्थित आहे. त्यांना त्वरीत पैसे देण्याची मागणी केली. यावर उद्या इथेनॉलचे 2 कोटी रुपये येणार आहेत. त्यानंतर आंदोलकातील शेतकर्‍यांना पैसे मिळतील असे आश्‍वासन दिले.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष पाटील यांच्यासह संघटक सिध्देश्‍वर घुगे, जिल्हा कार्याध्यक्ष अजिनाथ परबत, माढा तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड, बार्शी तालुकाध्यक्ष हनुमंत पाटील, युवा आघाडी अध्यक्ष शरद भालेराव आदीसह तीन तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

इंद्रश्‍वर कारखान्याने शेतकर्‍यांचे एकूण 32 कोटी रुपये थकीत ठेवले आहेत. मुदत देऊनही पैसे न दिल्याने आंदोलन केले. इंदापूरच्या एका नेत्याने सोलापूर जिल्ह्यातील धरणाचे पाणी चोरले तर याच ठिकाणचे दुसरे नेते सोलापूरच्या शेतकर्‍यांचे बुडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापुढे एफआरपी सह बिल न देणार्‍या कारखानदारांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे.
– शिवाजी पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

थकीत बिलाबाबत यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन दिले होते. आंदोलनाचा इशाराही दिला होता. येत्या आठ दिवसात शेतकर्‍यांचे पैसे देणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांना आश्‍वासन दिले आहे. त्याअनुषंगाने पैसे देणार आहे.
– ए. एस. जाधव, कार्यकारी संचालक, इंद्रेश्‍वर कारखाना

दोन शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल… 

एफआरपीसाठी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांपैकी काही जण आक्रमक झाले. त्यांनी कार्यालयाच्या वॉल कंपाऊंडची तोडफोड करुन अंकाऊट विभागातील काच फोडली. पोलिसांनी अनिकेत राऊत (रा. बार्शी) यांच्या फिर्यादीवरून तोडफोड करणार्‍यांपैकी बापूसाहेब गायकवाड (रा. रिधोरे, ता. माढा) व अनोळखी एक अशा दोघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कारखाना प्रशासनाने तोडफोड करणारे कारखान्याचे सभासद नव्हते,असा दावा केला आहे.

Back to top button