सोलापूर : बदलीसाठी गुरुजींनी भरली खोटी माहिती | पुढारी

सोलापूर : बदलीसाठी गुरुजींनी भरली खोटी माहिती

सोलापूर : संतोष सिरसट : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची ऑनलाईन प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेमध्येही आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी काही गुरुजींनी खोटी माहिती भरली आहे. त्यामुळे त्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा ग्रामविकास विभागाने उगारला आहे.

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा राजकारण्यांचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ऑनलाइन बदल्यांचा निर्णय घेतला. जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांसाठी पात्र शिक्षकांनी ऑनलाइन माहिती भरण्यास सांगितली जाते. या सगळ्या प्रक्रियेला त्यावेळी काही शिक्षक संघटनांकडून विरोध झाला. पण, यापैकी बर्‍याच शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरणही निर्माण झाले.

या निर्णयापूर्वी गुरुजींना आपली बदली करुन घेण्यासाठी राजकारण्यांकडे हेलपाटे मारावे लागत होते. राजकारणी लोक या गुरुजींचा उपयोग आपल्या राजकीय फायद्यासाठी करीत होते. ही गोष्ट तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे कणत्याही राजकीय व्यक्‍तीकडे जाण्याचा गुरुजींचा पायंडा बंद पडला.

एवढी सोय करुनही या प्रक्रियेत माहिती भरताना गुरुजी खोटी माहिती भरत आहेत. यापूर्वी अनेकवेळा असा प्रकार समोर आला होता. मात्र, तरीही गुरुजींनी खोटी माहिती भरण्याचा हट्ट सोडला नसल्याचे ग्रामविकास विभागाने 18 ऑगस्टला नव्याने काढलेल्या आदेशावरुन दिसून येते. आंतरजिल्हा बदल्यांसाठी संवर्ग एक व संवर्ग दोन असे गट केले आहेत.

संवर्ग दोनमध्ये येणार्‍या पती-पत्नी एकत्रीकरण व सर्वसाधारण संवर्गातून भरलेल्या अर्जांची पडताळणी केली असता त्यामध्ये बदली करुन घेण्यासाठी काही शिक्षकांनी त्या संवर्गात पात्र नसतानाही खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे बदलीचे अर्ज भरल्याचे ग्रामविकास विभागाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे त्या संवर्गातील पात्र शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.

ऑनलाईन अर्ज होणार बाद
खोटी माहिती भरल्याचे आढळल्यास त्या शिक्षकाचा अर्ज या प्रणालीमधून बाद करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी यांनी दिले आहेत. संबंधितांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. बदल्यांसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत संपल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज करता येणार नाही.

Back to top button