

सांगोला : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीच्या आधारे लंडन येथून गिफ्ट व पैसे पाठविण्याचे आमिष दाखवून खात्यावर पैसे टाकायला लावून एका शिक्षकाची 12 लाख 37 हजार 300 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागनाथ भीमराव दुधाळ रा. वासुदरोड दत्तनगर, सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी महिलेविरुद्ध सांगोला पोलिस स्टेशनमध्ये फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नागनाथ भिमराव दुधाळ या शिक्षकाची डिसेंबर 2021 मध्ये फेसबुकवर लंडन, युनायटेड किंग्डम येथील एलिझाबेथ स्मिथ नामक महिलेशी मैत्री झाली. त्यानंतर स्मिथ नामक महिलेने याने फिर्यादी नागनाथ दुधाळ या शिक्षकाला लंडनहून गिफ्ट व पौंड स्वरूपात असलेला चेक पाठविण्याचे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला. गिफ्ट घरपोच मिळेल याची खात्री देत अनोळखी महिलेने कुरिअर कंपनीला व्हेरिफिकेशन करायचे आहे असे सांगत फिर्यादी नागनाथ दुधाळ यांना फोन करून विदेशातून आलेले गिफ्ट दिलेल्या पत्त्यावर गिफ्ट पोहोच करण्यासाठी कुरिअर चार्जे स म्हणून रुपये 35 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. तसेच गिफ्टमध्ये 50 हजार ब्रिटिश पौंड रक्कम असलेला चेक असल्याने रजिस्ट्रेशन फी स्वरूपात एक लाख रुपये भरण्यास सांगितले. तसेच पौंडची रक्कम भारतीय चलनात रूपांतर करण्यासाठी आणखी 1 लाख 58 हजार 900 भरण्यास सांगितले. त्यानंतर अनोळखी महिलेने दुधाळ यांना फोन करून 5 लाख 3 हजार 400 रुपये इन्कम टॅक्स स्वरूपात भरण्यास सांगितले.
आणखी 2 लाख 55 हजार 700 भरावे लागतील असा मेसेज दुधाळ यांच्या मोबाईलवर आला. त्यानंतर आय. एम. एफ. कोडसाठी 6 लाख 9 हजार 300 रुपये इतकी रक्कम भरावी लागेल असे सांगितले. सदरची रक्कम रीफंडेबल असल्याचे सांगितले. मात्र, सदरची रक्कम भरणे अशक्य असल्याचे इतकी रक्कम भरणार नसल्याचे नागनाथ दुधाळ यांनी सांगितले. दरम्यान, तुम्ही 4 लाख 50 हजार रुपये भरलेले आहेत, तुम्ही राहिलेली रक्कम भरा, प्रक्रिया पूर्ण होईल असा मेसेज लंडन मधील अनोळखी मुलीचा दुधाळ यांच्या मोबाईलवर आला. त्यामुळे दुधाळ यांनी 1 लाख 59 हजार 300 रुपये फोन पे द्वारे भरले. कुरिअरला उशीर झाल्याने लेट चार्जेस 35 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र, पैसे पाठविल्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. लंडन येथील अनोळखी महिलेने शिक्षक नागनाथ दुधाळ यांचा विश्वास संपादन गिफ्ट व पैशाचे आमिष दाखवून आतापर्यंत सुमारे 12 लाख 47 हजार 300 रुपये वेळोवेळी भरण्यास सांगून फसवणूक केली आहे. याबाबत नागनाथ भिमराव दुधाळ रा. वासुदरोड दत्तनगर, सांगोला यांनी अनोळखी महिलेविरुद्ध सांगोला पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे .
सोशल मीडियावरून फसवणूक
सध्या अनोळखी महिलाकडून व्हॉटस् अॅप फेसबुकवरून मी तुम्हाला काहीतरी दाखवू इच्छिते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज करून व्हिडिओ कॉल करायला लावणे. यामध्ये अनेक युवक, शाळकरी मुले, ग्रामीण भागातील पुरुष यांना या मुली वेड लावत आहेत. भावनेच्या भरात युवक काहीही करतात.
एकदा का व्हिडिओ अगर कॉल रेकॉर्डिंग व शूटिंग झाला की पुन्हा मी पोलीस अधिकारी आहे. सीबीआय अधिकारी आहे. मुलींना काही पण बोलतो. काही पण कृत्य करतो अशी धमकी देत अर्वाचे शिवीगाळ केली जाते. यामुळे हे युवक विद्यार्थी ग्रामीण भागातील पुरुष घाबरतात. व त्यांच्या आमिषाला बळी पडतात. सांगोला तालुक्यात अनेक प्रकार घडले आहेत, घडत आहेत. यावर पायबंद घालने काळाची गरज आहे.