उजनीच्या पाईपलाईनला 15 दिवसांत दुसर्‍यांदा गळती | पुढारी

उजनीच्या पाईपलाईनला 15 दिवसांत दुसर्‍यांदा गळती

टेंभुर्णी : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या उजनी पाईपलाईन टेंभुर्णीजवळील पोलिस स्टेशनसमोरच 15 दिवसांत दुसर्‍यांदा गळती सुरू झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. पाणी गळतीमुळे टेंभुर्णी शहरातील जुन्या महामार्गावरील रस्त्यावरून 24 तास पाणी वाहत आहे.

या पाण्यामुळे रस्त्यावर मोठा राडा झाला आहे. रस्ते कामासाठी एक बाजू खोदून ठेवल्याने नागरिक अगोदरच संतापलेले आहेत. त्यात या सततच्या पाणी गळतीने कहर केला आहे. रस्त्यावरील खड्ड्यात भरलेले पाणी वाहनाने उडून लोकांच्या अंगावर जात असल्याने दुचाकीस्वार व पायी चालत जाणार्‍यांनी जायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टेंभुर्णी शहरात जुन्या महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम बंद असल्यागत कासव गतीने सुरू आहे. या कामासाठी रस्त्याची एक बाजू नाहक खोदून ठेवली असून दुसर्‍या बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्त्यावर सतत वाहतूकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर वाहनांची, दुचाकीस्वाराची सतत वर्दळ असून बसेस व इतर मोठी वाहने ही प्रचंड प्रमाणात ये-जा करीत असतात. यामुळे रस्त्यावरून जाताना प्रवाशांना जीव मुठीत धरून जावे लागते. याच रस्त्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या समोर सोलापूर शहरास पाणी पुरवठा करणारी भूमिगत पाईपलाईन या महिन्यात दुसर्‍यांदा फुटून चोवीस तास पाण्याची गळती सुरू आहे. हे पाणी कुर्डुवाडी चौकापासून बारवे मळा या अर्धा किमी अंतरात रोडवरून सतत वाहत आहे. यामुळे या रस्त्यावर खड्डे पडत आहेत. यामुळे छोटी-मोठी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. वाहने ये-जा करताना या खड्ड्यातील पाणी पायी जाणार्‍यांची व दुचाकीस्वरांच्या अंगावर उडून कपडे खराब होत आहेत. उडालेल्या पाण्यावरून नाहक वाद, हाणामार्‍या व वाहन चालकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. तरीही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

सामाजिक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात
संथ गतीने सुरू असलेले रस्त्याचे काम ही कंत्राटदाराने गतीने व दर्जेदारपणे करावे अशी मागणी होत आहे. काम सुरू असल्याने पावसाळ्यात अंगावर पाणी उडत आहे.तर पाऊस नसताना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.मोठी वाहने,बसेस यामुळे धुळीचे लोट उठत आहेत.याचा त्रास सर्वांना होत आहे.रस्ता खोदलेल्या बाजूची दुकानदारी मोडकळीस आली आहे.तसेच रखडलेल्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.हे काम तातडीने पूर्ण न केल्यास सामाजिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

योग्य पद्धतीने दुरुस्ती व्हावी
वारंवार पाईपलाईन फुटत असून पाणी गळती होत आहे, ही बाब सोलापूर महापालिका का गांभीर्याने घेत नाही असा प्रश्न वाहनधारकातून करण्यात येत आहे.तसेच पाणी गळतीची माहिती मिळून ही दखल घेतली जात नाही. ही गंभीर बाब आहे. यामुळे तातडीने व योग्य पद्धतीने पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Back to top button