रेल्वे टीसींकडे आता ‘हॅन्डहोल्ड टर्मिनल’ प्रणाली

रेल्वे टीसींकडे आता ‘हॅन्डहोल्ड टर्मिनल’ प्रणाली

सोलापूर : अंबादास पोळ : सोलापूर स्थानकावरून धावणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एचएचटी (हॅन्डहोल्ड टर्मिनल) सुविधा देण्यात आली आहे. सध्या 211 एचएचटी आधुनिक प्रणाली उपलब्ध झाली असून पहिल्या टप्प्यात 20 रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रणालीमुळे कागदोपत्री चार्टचा त्रास टळणार आहे. तिकीट तपासणीकांच्या हाती डिजिटल चार्ट येणार आहे.

सिद्धेश्वर, हुतात्मा, इंद्रायणीसह 20 लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये अत्याधुनिक 'एचएचटी' (हॅन्ड होल्ड टर्मिनल) प्रणालीद्वारे तिकीट तपासणी होणार आहे. तिकीट आरक्षीत केल्यानंतरही ते निश्‍चित होईपर्यंत प्रवाशांना धाकधुक असते. सुट्ट्यांच्या काळात आरक्षण मिळवण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागते. रेल्वेच्या या प्रणालीमुळे प्रवास करताना तिकीट आरक्षित झाल्याचे कळणार आहे. मोबाईल, टॅबसारख्या दिसणार्‍या एचएचटी प्रणालीमुळे तिकीट तपासणीकांची आरक्षित तिकिटांच्या तक्त्यातून सुटका होणार आहे. एकाच क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

काही स्थानकावर ठरवून दिलेला आरक्षण कोटा हा रिकामा राहतो. मात्र या प्रणालीमुळे गाडीतून प्रवास करताना प्रवाशांना कोणत्या स्थानकावरून आरक्षित तिकीट निश्चित होईल याची माहिती मिळणार आहे.
यापूर्वी रोज एका गाडीसाठी तीन प्रतीत छापील यादी तयार करावी लागत होती. पहिली यादी स्थानकावर दुसर्‍या गाडीच्या डब्यांना चिटकवण्यासाठी तर तिसरी यादी टीसी जवळ दिली जात असे. कागदी याद्यांमुळेे मनुष्यबळ, स्टेशनरी खर्च व वेळ वाया जात होता.
गाडीत आरक्षित तिकिटांसाठी प्रवाशांकडून टीसी पैसे उकाळत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. तसेच आरक्षित तिकिटाबाबत काळाबाजार करणार्‍यावर अंकुश बसणार आहे. रेल्वेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता येणार आहे. यापुढे आरक्षित तिकिटासंबंधी टीसीची मनमानी चालणार नाही. गाडीतील बर्थ रिकामी झाल्यास याची माहिती तत्काळ रेल्वे यंत्रणाला कळवावी लागणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेतील प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना आरक्षित तिकीट निश्चित होण्यास मदत होणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून सोलापूर विभागासाठी 211 एचएचटी (हॅन्ड होल्ड टर्मिनल) मिळाले आहे. पहिल्या टप्प्यात 20 रेल्वे गाड्यांमध्ये ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच गाड्यांमध्ये ही प्रणाली कार्यरत होईल. या प्रणालीमुळे रेल्वेचे स्टेशनरीवरील खर्च मनुष्यबळ व वेळेची बचत होण्यास मदत होईल.
-कल्पना बनसोडे
सहायक वाणिज्य प्रबंधक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news