श्री तुळजाभवानी मातेस श्रीकृष्ण वेशभूषा अलंकार महापूजा | पुढारी

श्री तुळजाभवानी मातेस श्रीकृष्ण वेशभूषा अलंकार महापूजा

तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्‍तिदेवता श्री तुळजाभवानी मातेची गुरुवारी (18 ऑगस्ट) श्री गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून मातेच्या सकाळच्या पंचामृत अभिषेक नित्योपचार पूजेनंतर श्रीकृष्ण अवतारातील वेशभूषा करून विशेष अलंकार महापूजा बांधण्यात आली.

या निमित्ताने देवीच्या गळ्यात मोरपिसांचे व तुळशीचे हार घालण्यात आले. याखेरीज मातेला त्याच धर्तीवर दागदागिन्यांचा साज चढविण्यात आला. या विशेष अलंकार महापूजेमुळे उठून दिसणारे देवीचे मनमोहक रूप पाहण्यासाठी शहर व परिसरातून भाविक भक्‍तांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी  गर्दी केली. सध्या मातेच्या सर्व धार्मिक पूजा विधी, सोहळे पूर्ववत् सुरू झाल्याने भाविक भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

सध्या श्रावणमास सुरू असल्याने दररोज हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू तुळजापुरात देवी दर्शनासाठी गर्दी करत आहेत. सध्या सर्वदूर देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असल्याने मातेच्या मुख्य महाद्वारालाही भारताच्या तिरंगा ध्वजाच्या रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आली असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 15 ऑगस्ट रोजी तिरंगा रंगातील फुलांनी मातेचा गाभारा सजवून मुख्य मुर्तीलाही आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते.

Back to top button