भीमेची पूरस्थिती टळली ‘उजनी’, ‘वीर’चा विसर्ग कमी; पंढरपुरात 63 हजार क्युसेक विसर्ग सुरूच | पुढारी

भीमेची पूरस्थिती टळली ‘उजनी’, ‘वीर’चा विसर्ग कमी; पंढरपुरात 63 हजार क्युसेक विसर्ग सुरूच

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : उजनी व वीर धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणार्‍या विसर्गात घट करण्यात आली आहे. उजनीतून 10 हजारांचा तर वीर नदीमधून 20 हजार क्युसेक विसर्ग कमी करण्यात आला आहे. यामुळे भीमा (चंद्रभागा) नदीची गंभीर बनत असलेली पूरस्थिती नियंत्रित आली असून धोका टळला आहे. भीमेत मात्र 63 हजार क्यूसेक विसर्ग सुरू असून अजूनही 6 बंधारे व दगडी पूल पाण्याखाली आहेत.

पंढरपुरातील पाणी पातळी किमान 10 ते 12 फुटांनी उतरली असल्याने शेती पिकांचे होणारे नुकसान टळले आहे.
उजनी व वीर धरणक्षेत्रात पाऊस सुरू आहे. याअगोदरच धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणात वरून येणारा विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू केला आहे. बुधवार दि. 17 रोजी सायंकाळी 5 वाजता 51 हजार 600 क्यूसेक विसर्ग भीमा नदीत सुरू करण्यात आला.
वीर धरणातून नीरा नदीमध्ये येणारा विसर्ग कमी झाला असून तो आता 15 हजार 211 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीची अद्यापही पूरस्थिती कायम आहे.

सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण यंदा लवकरच शंभर टक्के भरले आहे. उजनी धरणातील पाण्याच्या भरवशावर भीमा नदीच्या खोर्‍यात ऊस

शेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते. नदीला महापूर आला तर नदीकाठच्या ऊस शेतीचे पूराच्या पाण्याने नुकसान होण्याची भीती देखील शेतकर्‍यांना असते. यावेळीस देखील महापूराची स्थिती उभवते की काय? अशी भीती शेतकर्‍यांना होती. मात्र, बुधवारी सकाळपासून पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे नदीच्या काठाबाहेर पाणी पडलेले नाही. यातच पाणी पातळी आणखी कमी होताना दिसत असल्याने नदीकाठच्या 42 गावातील शेतकर्‍यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे

वीर व उजनी धरणातील विसर्ग कमी झाला असला तरी पंढरपूर येथे अद्याप 63 हजार चा विसर्ग सुरुच आहे. भीमा (चंद्रभागा)नदीपात्रात असलेले पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, विष्णुपद, मुंढेवाडी, पुळूज हे 6 बंधारे पाण्याखालीच आहेत. तर दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे. पाणी पातळी कमी होऊ लागल्याने महाव्दार घाट, दत्त घाट पायर्‍यावरील पाणी खाली उतरु लागले आहे. या पूरस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा लक्ष ठेवून आहे. तर सतर्कता प्रांताधिकारी गजानन गुरव व तहसीलदार सुशील बेल्हेकर पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. धरण परिसरात पाऊस वाढलाच तर विसर्गात वाढही होऊ शकते. असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामूळे नदीकाठच्या 42 गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात येत आहेत.

Back to top button