सोलापूर जिल्ह्यात घरोघरी झळकला तिरंगा | पुढारी

सोलापूर जिल्ह्यात घरोघरी झळकला तिरंगा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात घरोघरी तिरंगा झळकला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कुटुंबातील सदस्यांसोबत घरोघरी तिरंगा फडकावून देशाप्रती अभिमान व्यक्त केला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवार, 13 ते सोमवार, 15 ऑगस्ट या तीन दिवसांदरम्यान जिल्ह्यातील 4 लाख 66 हजार घरांवर तिरंगा झेंडा झळकला.

या उपक्रमासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तिरंगा वाटप करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, सहकारी संस्था, निमशासकीय संस्था, खासगी कार्यालयांनी या अभियानात सहभागी होत तिरंगा झेंडा लावला असल्याचे जिल्ह्याभरात दिसून येत आहे.

‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी जिल्ह्यातील 1123 गावांतील ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी प्रत्येक गावात जनजागृतीही करण्यात आली होती.झेंडा उभारण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनाही नागरिकांना देण्यात आल्या. शासकीय व निमशासकीय कार्यालयांत होणारे ध्वजारोहण हे ध्वजसंहितेचे पालन करून तीन दिवसांच्या अभियान काळात रोज ध्वजारोहण करून सायंकाळी ध्वज काढण्यात येणार आहे.

घरोघरी 13 ऑगस्टचा फडकाविण्यात आलेला झेंडा 15 ऑगस्ट रोजी सांयकाळी काढण्यात येणार आहेत. अभियानानंतर नागरिकांनी घरातील झेंडे सन्मानपूर्वक जतन करून ठेवावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी तालुका संपर्क अधिकारी नेमून याबाबत प्रत्येक कार्यक्रमाची शहानिशा केली जात आहे.

Back to top button