सोलापूर : मंत्रीपद न मिळाल्याने सोलापुरात नाराजीचा सूर | पुढारी

सोलापूर : मंत्रीपद न मिळाल्याने सोलापुरात नाराजीचा सूर

सोलापूर : महेश पांढरे :  नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातील भाजप आमदारांना डावलण्यात आले. भाजपकडून तीन तीन – चार चार टर्म निवडून आलेल्या आ. विजयकुमार देशमुख आणि आ. सुभाष देशमुख यांनाही स्थान मिळाले नाही. त्यामुळे सोलापुरात नाराजीचा सूर दिसून आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असलेल्या आ. विजयकुमार देशमुखांकडे फडणवीसांनी मंत्रिमंडळात स्थान देताना दुर्लक्ष का केले. आ. सुभाष देशमुख यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान देण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कमी का पडले, याविषयी जिल्हाभर चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद आहे. सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. विविध विधानसभा मतदारसंघांतून आठ आमदार आहेत. तरीही मंत्रिमंडळामध्ये जिल्ह्यातील एकाही आमदाराला स्थान मिळाले नाही. राजकीयदृष्ट्या हा भाजपचा पक्षांर्तगत विषय असला तरी यामुळे नाराजीचा सूर आहे.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे व भाजपच्या 9-9 सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भविष्यात होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारात आता कॅबिनेट मंत्रिपदे मोजकीच शिल्लक आहेत. त्यामुळे भविष्यात सोलापूरच्या आमदारांना कॅबिनेट मिळणार की राज्यमंत्रीपदावरच समाधान मानावे लागणार, हाही उत्सुकतेचा विषय आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच आपापल्या विधानसभा मतदारसंघांतील विकास योजना पूर्ण करण्यासाठी मंत्रिपदाची ताकद असणे महत्त्वाचे मानले जाते. जिल्ह्याला वजनदार मंत्रीपद मिळाले नाही, तर त्याचा विपरित परिणाम जिल्ह्याच्या विकासावर होऊ शकतो. सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्याने जिल्ह्यात चर्चा होत आहे.

विधानसभेची दोन टर्म, विधानपरिषदेची एक टर्म आणि लोकसभा खासदार एवढा दांडगा अनुभव पाठीशी असतानाही आ. सुभाष देशमुख यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली
आहे.

शहरातील भाजपचा कणा मजबूत करण्यासाठी तसेच सोलापूर महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून हॅट्ट्रिक करणारे तसेच उपद्रव्यमूल्य कमी असणार्‍या आ. विजयकुमार देशमुख यांना तरी संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनाही या मंत्रिमंडळ स्थापनेत स्थान मिळाले नाही. त्यामुळे केंद्रातील भाजप नेत्यांनीच मिशन देवेंद्र यांना लगाम लावण्यासाठीच त्यांच्या गटाच्या अनेक आमदारांना मंत्रिपदापासून दूर ठेवले की काय, अशीही चर्चा आहे.

सोलापुरात 2 खासदार अन् 8 आमदार
जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद असतानाही जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडूनही जिल्ह्यातील भाजपवर टिका केली जात आहे. जिल्ह्यात आठ आमदार आणि दोन खासदार असतानाही मंत्रिमंडळात भाजपच्या एकाही आमदाराचा समावेश झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यतील भाजप नेत्यांना मंत्री पदासाठी आता कंबर कसावी लागणार आहे.

आ. शहाजीबापूंही दूर्लक्षित…
सत्तांतरादरम्यान गुवाहाटी येथून निसर्गाचे आपल्या खुमासदार माणदेशी भाषेत वर्णन करणारे शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आ. शहाजी पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी पक्की खात्री कार्यकर्त्यांना होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

Back to top button