सोलापूरचे पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता | पुढारी

सोलापूरचे पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : बर्‍याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मंगळवारी मुहूर्त लागला. सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र मात्र भूम परांड्याचे आमदार तानाजी सावंत यांची एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यात जल्लोष करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्याशी निगडित त्यांचे राजकारण असल्याने त्यांना सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळू शकते. दरम्यान, जिल्ह्यातील भाजपाच्या गोटातील प्रमुख दावेदार असलेले आ. सुभाष देशमुख आणि आ. विजयकुमार देशमुख यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकत्व सावंत यांना मिळू शकते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे म्हटले जाते.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जिल्ह्यातील आमदारांची ज्येष्ठता गृहीत धरली जाईल अशी अपेक्षा अनेकांना होती. भाजपाचे आ. विजयकुमार देशमुख आणि आ. सुभाष देशमुख यांच्यापैकी एकाला पहिल्या टप्यात मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्या दोघांनाही भाजपाने वेटींगवर ठेवले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आ. तानाजी सावंत आणि सांगोल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांना पहिल्या टप्यात संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी शहाजी पाटील यांचे नाव मागे पडले. तर आ. सावंत यांना मात्र पहिल्या टप्यात कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली. आता सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबबादारीही त्यांच्यावरच सोपविली जाईल अशी चर्चा आहे.

विशेष तपशील…

– जिल्ह्यातील अनेक आमदारांना आता मंत्री मंडळाच्या पुढील विस्तारापर्यंत थांबावे लागणार
– दोन्ही देशमुखासह जिल्ह्यातील मंत्रीपदासाठी इच्छुक असणार्‍या आमदारांना आता मंत्रिमंडळाच्या विस्तारापर्यत वेट आणि वॉच करण्याची वेळ
– आ. सावंतांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला आता जिल्ह्यात बळकटी मिळणार आहे.

Back to top button