सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात महापुरातून अंत्ययात्रा ! | पुढारी

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात महापुरातून अंत्ययात्रा !

सोलापूर-हंजगी ; पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर परिसरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे पितापूर (ता. अक्कलकोट) येथील हरणा नदीला पूर आला आहे. कुरनूर धरणाच्या बॅक वॉटरचा हा परिसर असल्याने पुराचा धोका अधिकच आहे. नदीवर पूल नसल्याने अनेक वर्षांपासून या गावाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशात मंगळवारी निधन पावलेल्या व्यक्तीची अंत्ययात्रा चक्क महापुरातून अन्य नागरिकांचे जीव धोक्यात घालून न्यावी लागली. पुराचे पाणी ओलांडून जीव धोक्यात घालून अंत्यविधी उरकण्याची वेळ पितापूरकरांवर आली.

नूरअली साहेबअली भंडारी यांचे निधन झाले. अंत्यविधीचे ठिकाण नदीच्या पलीकडे असल्याने त्याठिकाणीच अंत्यविधी करणे क्रमपात्र होते. मात्र, नदीला महापूर आल्याने अंत्यसंस्कार कुठे करायचे हा प्रश्न होता. त्यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. नातेवाईक नदीच्या पलीकडे थांबले आणि ज्यांना पोहता येते अशा व्यक्तींनीच अंत्ययात्रा पैलतीरी पोहोचवून अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली.

एक तर पाण्याचा प्रवाह मोठा आणि त्यात खांद्यावर तिरडी घेऊन जायचे कसे. त्यात पाण्याचा लोंढा जर आला तर त्यातून मार्ग काढून पैल तीर कसा गाठायचा? या सगळ्यावर मात करण्यासाठी चक्क तिरडीवर बांधलेला मृतदेह बॅरलवर ठेवण्यात आला व बॅरेल महापुराच्या प्रवाहात ढकलत हरणा नदीच्या पलीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न झाला.

यावेळी पाण्याच्या प्रवाहाने त्या लोकांचे पाय घसरू लागले. तरीही त्या व्यक्तींनी स्वतःवर विश्वास ठेवून मोठ्या जिद्द आणि चिकाटीने नदीच्या पलीकडे मृतदेह पोहोचवला. हा सगळा प्रकार नदीच्या दुसर्‍या टोकाला थांबून पाहणार्‍यांच्या हृदयाचे ठोके मात्र वाढवून गेले. मृत व्यक्तीची शेवटची यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी अनेकांनी आपला जीव धोक्यात घातला.

25 वर्षांपासून मागणी अपूर्ण

पितापूरकरांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गेल्या 25 वर्षांपासून लढा द्यावा लागत आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याचा विचार केलेला नाही. यामुळे नागरिकांना पितापूरहून सोलापूरला येण्यासाठी हन्नूर आणि नन्हेगावमार्गे जावे लागत आहे. हा प्रवास धोकादायक तर आहेच. शिवाय जास्त अंतराचाही आहे. 25 वर्षांपासून पुलाची मागणी पूर्ण होत नसल्याने नागरिक चक्क हतबल झाले आहेत. आजपर्यंत अक्कलकोट तालुक्याला गृहराज्यमंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री ही पदे सिद्धाराम म्हेत्रे यांच्या माध्यमातून मिळाली. आता खासदार हे अक्कलकोट तालुक्याचेच आहेत. शिवाय आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ख्याती आहे. तरीही त्यांचे या घटनेकडे दुर्लक्ष होणं ही बाब चिंतनीय आहे.

Back to top button