सोलापूर : सहा गावांसाठी ना भुयारी मार्ग, ना सर्व्हिस रोड | पुढारी

सोलापूर : सहा गावांसाठी ना भुयारी मार्ग, ना सर्व्हिस रोड

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा :   सोलापूर-अक्कलकोट या नव्याने होत असलेल्या महामार्गावरील कर्देहळ्ळी फाटा येथे कर्देहळ्ळीसह इतर सहा गावांसाठी ना भूयारी मार्ग केला ना सर्व्हिस रोड. मुख्य रस्त्याने उलट दिशेने जीव धोक्यात घालूनच येथील नागरिकांना वाहने हाकावी लागत आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत सांगा साहेब, आम्ही मुख्य रस्त्यावर यायचे कसे? असा सवाल केला.

ग्रामस्थांची ही व्यथा ऐकून जिल्हाधिकारी शंभरकर यांनीही तत्परतेने राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे संचालक सुहास चिटणीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून कुंभारी ओढा ते कर्देहळ्ळी फाट्यापर्यंत सर्व्हिस रोड तयार करण्याची सूचना केली.

सोलापूर-अक्कलकोट महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या मार्गावर अनेक ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, कुंभारीच्या पुढे 1 किलोमीटर अंतरावर कर्देहळ्ळी, शिर्पनहळ्ळी, धोत्री, वडगाव, रामपूर, दिंडूर या सहा गावांना जोडणार्‍या कर्देहळ्ळी फाट्यावर ना उड्डाणपूल, ना भूयारी मार्ग ना सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे. कर्देहळ्ळीसह वरील सहा गावांतील नागरिकांचा दररोज सोलापूरशी संबंध येतो. येथील शेतकरी भाजीपाला व अन्य शेतीपिकांची विक्री करण्यासाठी सोलापूरला येतात. तसेच विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात. एमआयडीसीत काम करणार्‍या कामगारांचीही संख्या मोठी आहे. या मार्गावरून मोठी वर्दळ आहे.

कर्देहळ्ळी फाट्यावर नागरिकांना सोलापूर शहराकडे येण्यासाठी कसलीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नाही. रस्त्याच्या मधोमध दुभाजक बनविल्याने कर्देहळ्ळीसह सहा गावातील नागरिकांना रस्ता ओलांडून मुख्य मार्गावर येण्यासाठी जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत.

सहा गावातील सुमारे 40 हजार लोकसंख्येसाठी नागरिकांनी मागणी करूनही उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग अथवा अन्य कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे रस्ता ओलांडण्याची मोठी पंचाईत होऊन बसली आहे. गेल्या काही दिवसापासून चुकीच्या बाजूने येण्यामुळे येथे अपघाताची मालिका सुरू झाली आहे. अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत. काम पूर्ण झाल्यावर तर खूपच मोठी गैरसोय होणार आहे. येथील नागरिकांना चुकीच्या दिशेने (राँग साईडने) प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

स्वातंत्र्यदिनी रास्ता रोको अन् उपोषणाचा इशारा
नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा अशी सोय करण्यात यावी. जीव टांगणीला लागलेल्या येथील नागरिकांसाठी कर्देहळ्ळी फाट्यावर उड्डाणपूल, सर्व्हिस रोड किंवा अन्य पर्याय उपलब्ध करून द्यावा. अन्यथा येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी कर्देहळळी फाट्यावर रास्ता रोको व झेंडा वंदनावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 निवेदनाद्वारे अधिकार्‍यांकडे तक्रार
या निवेदनाची प्रत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांच्या नावे समन्वय अधिकारी अनिल विपत यांनाही देण्यात आले आहे. यावेळी सरपंच नागेश शिंदे, उपसरपंच अशोक माने, माजी सरपंच शाहू पौळ, सामाजिक कार्यकर्ते कृष्णात पवार व सौदागर पवार उपस्थित होते.

Back to top button