श्रीकांत देशमुख यांची पोलिस ठाण्यात हजेरी | पुढारी

श्रीकांत देशमुख यांची पोलिस ठाण्यात हजेरी

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : महिलेवरील दुष्कर्मप्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास सदर बझार पोलिस ठाण्यात हजेरी देण्यासाठी हजर झाले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते परत गेले. यावेळी पोलिस अधिकार्‍यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशी केल्याचे समजते.

देशमुख यांना 26 आणि 27 जुलै रोजी पोलिस ठाण्याला हजेरी देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी दिला आहे.

एका महिलेवर केलेल्या कथित दुष्कर्मप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी दाखल केलेल्या अंतिम अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरभाते यांनी देशमुख यांना पोलिस ठाण्यास हजेरी देण्याच्या अटीवर त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने देशमुख यांना 26 आणि 27 जुलै रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत पोलिस ठाण्यात हजर राहून हजेरी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार देशमुख हे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास सदर बझार पोलिस ठाण्यात त्यांचा भाऊ व अ‍ॅड. बाबासाहेब जाधव यांच्यासमवेत हजर झाले.

सदर बझार पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्यासमोर हजर झाल्यानंतर पोलिस निरीक्षक भोसले यांनी देशमुख यांना सहायक पोलिस आयुक्त माधव रेड्डी यांच्यासमोर नेले. त्याठिकाणी देशमुख यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधिकार्‍यांनी चौकशी केल्याचे समजते. हजेरीचा कालावधी व चौकशी पूर्ण झाल्यानंतर देशमुख हे अ‍ॅड. जाधव यांच्यासमवेत कारमधून तडक निघून गेले.

मुंबई येथील एका महिलेने अर्जदार श्रीकांत देशमुख यांनी त्यांना लग्नाचे अमिष दाखवून मुंबई, सोलापूर, पुणे, सांगली इत्यादी ठिकाणी त्यांच्यावर दुष्कर्म केले, मात्र लग्न केले नाही अशा आशयाची फिर्याद प्रथमता पुणे येथील डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मात्र पोलिसांनी ती सोलापूरच्या सदर बझार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.

Back to top button