सोलापूर : सेन्सरने कळवले नियंत्रण कक्षाला अन् चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा डाव फसला

सोलापूर : सेन्सरने कळवले नियंत्रण कक्षाला अन् चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा डाव फसला

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : मोहोळ शहरातील कुरुल रस्त्यावरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव सेन्सर आणि त्यानंतर पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे उधळला गेला. चोरट्यांनी सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर स्प्रे मारल्यानंतर बँकेच्या नियंत्रण शाखेला सेन्सरद्वारे माहिती पुरवली गेली. नियंत्रण शाखेने ग्रामीण पोलीस नियंत्रण शाखा आणि मोहोळ पोलिसांना कळवल्यानंतर गस्तीवरील पोलिसांच्या पथकांनी एटीएमकडे धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच दोन दुचाकींवरून आलेले चार चोरटे पसार झाले. शनिवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार घडला.

मोहोळ शहरात मध्यवर्ती ठिकाणी कुरुल रस्त्यावर भारतीय स्टेट बँक आणि जवळच एटीएम आहे. शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास तोंडाला कपडा बांधलेले दोन चोरटे एटीएम सेंटरजवळ आले. त्यातील एक जण बाहेरच होता. तर दुसरा आत गेला. त्याने कलरचा स्प्रे चार सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर मारायला सुरुवात केली. त्याचवेळी सेन्सरद्वारे बँकेच्या एटीएम विभागाच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. तेथून सोलापूर पोलीस नियंत्रण कक्ष व मोहोळ पोलीस ठाण्यात ही माहिती देण्यात आली.

रात्रपाळीला असलेले पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार यांनी गस्ती पथकातील फौजदार राजेंद्र राठोड, दुसर्‍या पथकातील सहायक फौजदार मारुती लोंढे, तिसर्‍या पथकातील कॉन्स्टेबल सचिन पुजारी यांना माहिती कळविली. मोहोळ शहरातील, पेनूरकडून येणारे, शेटफळकडून येणारे अशा तिन्ही पथकांतील हेडकॉन्स्टेबल शरद डावरे, कॉन्स्टेबल पठाण, चालक संतोष कुंभार, शिवानंद शिवणे आदींनी एटीएम सेंटरकडे धाव घेतली. पोलिसांच्या भरधाव वाहनांचे आवाज ऐकून दोन दुचाकींवरून आलेले चार चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी परिसरात शोध घेतला, परंतु चोरटे पसार झाले होते.

एटीएमची सुरक्षा रामभरोसे

एटीएम सेंटरमध्ये मोठी रक्कम भरल्याचा अंदाज घेऊन चोरीचा प्रयत्न झाला असल्याचा संशय आहे. तीन राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या मोहोळ शहरात आयडीबीआय बँकेच्या एटीएमव्यतिरिक्त कोणत्याही एटीएमला रात्रपाळीसाठी सुरक्षा व्यवस्था नाही.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news