देशात शिखांच्या पगडीला विराेध नाही; मग हिजाबलाच विरोध का ? : अबू आझमी यांचा सवाल | पुढारी

देशात शिखांच्या पगडीला विराेध नाही; मग हिजाबलाच विरोध का ? : अबू आझमी यांचा सवाल

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : ज्या देशांमध्ये शिखांच्या पगडीला विरोध केला जात नाही. तिथे मात्र, मुस्लिम धर्मातील महिलांच्या हिजाबलाच विरोध का?, असा सवाल समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांनी केला. विविध शहरांच्या नामांतरावरून जनजागृती करण्यासाठी अबू आझमी हे राज्य दौर्‍यावर आहेत. या दौऱ्या निमित्त शनिवारी उस्मानाबादला जाण्यासाठी सोलापूरला आले असता सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी आझमी म्‍हणाले, ” ज्या देशांमध्ये एखादी व्यक्ती नग्न राहते. लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपचे नाते ठेवते आणि पुरूष आपल्याला हव्या त्या पुरूषासोबत समलैंगिक संबंध प्रस्थापित करू शकतात. त्या देशात आपले अंग झाकण्यासाठी हिजाब वापरणाऱ्या महिला व मुलींना विरोध करणे ही खूप मोठी शोकांतिका आहे.”

या वेळी त्‍यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने नुकताच एक न्यूड फोटोशूट करत इंटरनेटवर टाकल्याने त्याचाही समाचार खास शैलीत त्यांनी घेतला आहे. उस्मानाबाद व औरंगाबाद आदी शहरांच्या नामांतरावरही त्यांनी भाष्य केले.

“केवळ शहरांची नावे बदलून जर विकास होत असेल तर त्याला विरोध नाही. मात्र, केवळ मुस्लीम नाव बदलून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात असून, त्याला आपला विरोध असल्याचे ते म्हणाले. तुम्हाला नावेच द्यायची असतील तर त्यासाठी नवी शहरे निर्माण करा आणि त्याला हवे ती नावे द्या. त्याला आपला विरोध करण्याचे कारण नाही,” असेही ते म्हणाले.

देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी याकडे सरकारचे दुर्लक्ष हाेत आहे, असा आराेप करत आपल्या देशात श्रीलंकेसारखी स्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. धर्मांतराच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, २०१४ नंतर देशातील राजकारण बदलल्याने सामाजिक परिस्थिती दूषित झाली असून हिंदूंकडून पैसे देऊन मुस्लिमांचे धर्मांतरण घडवून आणले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरांची नावे बदलून दोन धर्मांमध्ये फूट

औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांची नावे बदलून सरकार हिंदू-मुस्लीम या दोन धर्मांमध्ये फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्‍यांनी केला.

हेही वाचलंत का? 

Back to top button