सोलापूर : अटकेच्या भीतीने श्रीकांत देशमुख फरार | पुढारी

सोलापूर : अटकेच्या भीतीने श्रीकांत देशमुख फरार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  लग्नाचे आमिष दाखवून 31 वर्षीय महिलेस बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल भाजपा सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या अटकेसाठी जवळा येथे छापा टाकण्यात आला. पण, ते फरार असल्याचे सदर बझार पोलिस ठाण्याच्या निरीक्षक अश्‍विनी भोसले यांनी सांगितले.

एक 31 वर्षीय महिला ही आपल्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवित आहे. अशी तक्रार भाजपाचे तत्कालीन सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी मुंबईतील ओशीवरा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्याचा तपास अजूनही सुरू व्हायचा आहे. तोपर्यंत एका पीडित महिलेने एका हॉटेलच्या बेडरूम मधील एक व्हिडीओ व्हायरल केला. यात ती महिला म्हणतेय, हाच श्रीकांत देशमुख यानेच माझी फसवणूक केली आहे. या व्हिडीओमुळे श्रीकांत देशमुखच अडचणीत आहे.

त्यानंतर त्या महिलेने ई-मेल व्दारे महिला आयोगाकडे श्रीकांत देशमुख यांच्याविरुद्ध तक्रार केली. याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्या पीडित महिलेने पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात श्रीकांत देशमुख विरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली. यामुळे तर श्रीकांत देशमुख हे जास्तच अडचणीत आले. फिर्याद दाखल झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी श्रीकांत देशमुख यांनी सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा सोलापूरच्या सदर बझार पोलिस ठाण्यात वर्ग झाला. यानंतर सदर बझार पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन माळी यांच्यासह पथक दोन वेळेस सांगोला वारी करून आले. पण श्रीकांत देशमुख हे त्यांच्या हाती लागले नाहीत. तपास सुरू आहे.

Back to top button