‘त्या’ मिळकतदारांना रक्‍कम परत मिळणार | पुढारी

‘त्या’ मिळकतदारांना रक्‍कम परत मिळणार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेचा मिळकत कर घरबसल्या ऑनलाईन भरणे मिळकतदारांच्या द‍ृष्टीने सोयीचे असले तरी हा कर भरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. पेमेंट दोनदा कट होण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकरणांमध्ये जर पावती तयार झाली नसेल तर मिळकतदारांना दुहेरी रकमेपैकी एक रक्कम परत मिळणार आहे.

शासन निर्देशानुसार गत काही वर्षांपासून मिळकतकरासह मनपाच्या विविध कामांसंदर्भातील रक्कम ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे प्रत्यक्ष महापालिकेत किंवा त्यांच्या अन्य कार्यालयांमध्ये न जाता नागरिकांना घरबसल्या पैसे भरता येत असल्यामुळे त्यांच्या वेळेची बचत होत आहे. ऑनलाईन पैसे भरणे सुकर व विनासायास मानले जाते, मात्र सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे अनेकदा रक्कम भरण्यासंदर्भात नागरिकांची गोची होत आहे.

सध्या मिळकर कराच्या बिल वाटप होत आहेत. त्यामुळे अनेक लोक ऑनलाईन कर भरत आहेत. हे कर भरताना तांत्रिक अडचणीमुळे रक्कम अकाऊंटमधून जरी कट झाले असले तरी प्रत्यक्षात मनपाच्या खात्यावर जमा होत नाही अशी अडचण येत आहे. त्यामुळे लोक दुसर्‍यांदा कर भरण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी दोनवेळा रक्कम कट होण्याचे प्रकार घडत आहे. अशा प्रकरणांमध्ये जर ऑनलाईन पावती जर तयार झाली नसेल तर अशा मिळकतदारांना दुसर्‍यांदा भरलेली रक्कम त्यांच्या खात्यावर मनपाकडून ऑनलाईनवरच परत केली आहे. जर पावती तयार झाल्यास पुढील वर्षाच्या कराबाबत मनपाच्या खात्यावर अ‍ॅडव्हान्स म्हणून रक्कम जमा केली जात आहे.

ऑनलाईनबाबत तक्रारी

ऑनलाईनवर दोनदा रक्कम कट होण्याच्या प्रकरणांबाबत मिळकतदारांच्या मनपाकडे तक्रारी येत आहेत. ऑनलाईन कर भरणे लोकांच्या द‍ृष्टीने कटकटीचे झाले आहे. अशा प्रकरणांबाबत मनपाच्या कर विभागाकडून तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे. पावती तयार न झालेल्यांनाच पैसे परत मिळत आहे.

Back to top button