पंढरपूर: आषाढी वारीत विठ्ठल चरणी ५ कोटी ७० लाखांचे दान अर्पण | पुढारी

पंढरपूर: आषाढी वारीत विठ्ठल चरणी ५ कोटी ७० लाखांचे दान अर्पण

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांच्या अंतराने यावर्षी पंढरपूर यात्रा (आषाढी वारी) भरली होती. यावर्षी दहा लाखाहून अधिक भाविक आषाढी एकादशीसाठी पंढरपूर क्षेत्री दाखल झाले होते. भाविकांनी पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन, कलश आणि मुख दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी पांडुरंग चरणी तब्बल ५ कोटी ७० लाख रुपयांचे दान अर्पण केले. याबाबतची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गुरव यांनी दिली आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये झालेल्या आषाढी यात्रेत ४ कोटी ४० लाख रुपयांची देणगी मिळाली होती. यावर्षी विठ्ठलाला सोने आणि चांदीचे दागिने ही मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दान केले आहेत. यंदाच्या आषाढी यात्रेत १ कोटी ३० लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे.
भाविकांनी मंदिर समितीला देणगी स्वरूपात दान केल्यास समितीच्या वतीने भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होईल, असेही मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गुरव यांनी सांगितले. दरम्यान, आषाढी वारी सोहळ्यानंतर चातुर्मासास प्रारंभ झाला असून पंढरपूरात विविध मठ आणि धर्मशाळांमध्ये भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरु झाले आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button