मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी केली जाहीर? | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी केली जाहीर?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. यावेळी शिंदे गटाकडून शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडही करण्यात आली असून शिवसेना पक्षप्रमुखपदाला हात लावलेले नाही. मात्र आमदारांचा विषय न्यायप्रविष्ठ असतानाही एकनाथ शिंदेंनी नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे.

आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. याशिवाय उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली. आता तर खासदार सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे 14 खासदार हे ऑनलाईन बैठकीला हजर असल्याचेही समजते आहे.

शिंदे गटाच्या आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेनेचे 19 पैकी 14 खासदार उपस्थितीत असल्याचे समजते आहे. जर तसे असल्यास हा शिवसेनेला मोठा धक्का मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार हे शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा रंगली होती.

Back to top button