पंढरपूर : शेगाव दुमाला विषबाधा प्रकरणी दोषींवर कारवाई करणार : अप्पर जिल्हाधिकारी | पुढारी

पंढरपूर : शेगाव दुमाला विषबाधा प्रकरणी दोषींवर कारवाई करणार : अप्पर जिल्हाधिकारी

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : शेगाव दुमाला (ता. पंढरपूर) येथील विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणाऱ्या ४३ मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिले आहेत.

विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणाऱ्या ४३ मुलांना रविवारी (दि.१७) अन्नातून विषबाधा झाली हाेती. त्यांना उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे दाखल केले आहे. या मुलांची आज अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी भेट घेवून विचारपूस केली. त्यांच्यासमवेत तहसीलदार सुशील बेल्हेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम उपस्थित होते.

विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणाऱ्या मुलांनी शेजारील मोतीराम महाराज मठात पंगत असल्याने जेवायला गेले होते. जेवणानंतर ४३ मुलांना उलट्या, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे जाधव यांनी सांगितले.

संबंधित ठिकाणच्या जेवणातील सर्व पदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून घेण्यात आले आहेत. ते नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिल्याचे अप्पर जिल्हाधिकारी जाधव यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button