सोलापूर : बोरगावात विषारी मण्यार चावल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू | पुढारी

सोलापूर : बोरगावात विषारी मण्यार चावल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू

हंजगी;  पुढारी वृत्तसेवा :  अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव (दे) येथे शुक्रवार (दि. 15) रोजी पहाटे पाच वाजता एका 6 वर्षीय अल्पवयीन मुलाला झोपेत मण्यार जातीचा विषारी साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला.

महादेव स्वामीनाथ हत्तरके असे त्या मृत बालकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री सर्वजण नेहमीप्रमाणे झोपले होते. दरम्यान, रात्रीच्यावेळेस महादेवला सापाने दंश केला. पहाटे पाच वाजता त्याला त्रास होऊ लागला. या दुर्दैवी घटनेनंतर त्या बाळाला अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांपूर्वी त्या बालकाचा मृत्यू झाला. अतिविषारी मण्यार सापाने या चिमुकल्या बाळाला दंश केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या चिमुकल्या बाळाच्या पश्‍चात आई, वडील व लहान भाऊ आहे. घरची परिस्थिती नाजूक असून मोलमजुरी करुन हे कुटुंब उपजीविका करते. शासनाकडून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.

Back to top button