सोलापूर : जिल्ह्यात अतिवृष्टी | पुढारी

सोलापूर : जिल्ह्यात अतिवृष्टी

सोलापूर; पुढारी वृत्‍तसेवा :  सोलापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अतिवृष्टीसद‍ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी (दि. 12) दिवसभरात जिल्हाभरात एकूण 67.3 मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या पावसामुळे खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. दुसरीकडे शहरात पावसामुळे तळे साचून दलदल झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मंगळवारी 24 तासांत जिल्हाभरात सरासरी एकूण 67.3 मि.मी. इतका पाऊस नोंदला गेल्याने जिल्ह्यात पहिल्यांदाच अतिवृष्टी नोंदली आहे. या पावसामुळे आतापर्यंत केलेल्या खरीप पिकांना धोकाही निर्माण झाला आहे. पावसाची रिपरिप सुरूच असल्याने खरीप पिके पाण्यात जळून जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

मंगळवारी 24 तासात झालेल्या पावसात उत्‍तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक 108 मिमी इतका पाउस पडला आहे. तर सर्वात कमी सांगोला तालुक्यात 27 मिमी इतका पाउस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात 68.8, बार्शी तालुक्यात 102.4, अक्‍कलकोट तालुक्यात 86.9, मोहोळ तालुक्यात 71.9, माढा तालुक्यात 66.5, करमाळा तालुक्यात 63.2, पंढरपूर तालुक्यात 67.5, माळशिरस तालुक्यात 42.8 तर मंगळवेढा तालुक्यात 49.4 मिमी इतका पाउस पडला आहे.

Back to top button