सोलापूर : मिनी मंत्रालयात उडणार राजकीय धुरळा | पुढारी

सोलापूर : मिनी मंत्रालयात उडणार राजकीय धुरळा

हंजगी; यशवंत पाटील :  महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित असतानाही निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी, दुधनी आणि अक्कलकोट या तीन नगरपरिषदेत यंदा राजकीय धुरळा पाहायला मिळणार आहे. तालुक्यातील जनतेचे व कार्यकर्त्यांचे निवडणुकांकडे लक्ष लागले होते.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका हा एकमेव तालुका आहे, जिथे अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी अशा तीन नगरपालिकांचा समावेश आहे.त्यामुळे तालुक्यातील या तीन मिनी मंत्रालयाची निवडणूक मात्र रंगतदार ठरणार आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि 19 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होणार असल्याने सध्या तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. यंदा 2011 च्या आराखड्याप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आल्याने सदस्यांची संख्याही वाढणार आहे. या वाढीव सदस्य संख्येमुळे इच्छुकांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. भावी नगरसेवक होण्याची स्वप्ने पाहणारे कार्यकर्ते सध्या दिवसाही स्वप्न पाहताना दिसतात.

अक्कलकोट नगरपरिषद : अक्कलकोट नगरपालिकेवर नेहमीच भाजपचे वर्चस्व राहिले आहे. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा दुरंगी सामना होण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु अचानक महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्याने आता अक्कलकोट मिनी मंत्रालयातील सत्ता समीकरणही बदलणार आहे.

या नगरपरिषद निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 25 सदस्यसंख्या असलेल्या नगरपालिकेत भाजपचे 15, तर काँग्रेसचे 8 नगरसेवक आहेत. भाजपच्या शोभा खेडगी या नगराध्यक्षा आहेत. शहरात खेडगी परिवारालाही मानणारा मोठा गट आहे. नुकतेच नगराध्यक्षा शोभा खेडगी यांचे पती शिवशरण खेडगी यांचे निधन झाल्याने खेडगी परिवार या निवडणुकीत काय भूमिका घेणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व रासपकडूनही जोरदार तयारी सुरू केली आहे.

दुधनी नगरपरिषद : दुधनी नगरपरिषदेत नेहमीच काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. पन्नास वर्षांत दुधनी नगरपरिषदेवर माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचेच वर्चस्व राहिले आहे. दुधनी नगरपालिकेत एकूण 17 जागांपैकी 15 काँग्रेसकडे, तर 2 जागा भाजपकडे आहेत. गेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडी झाल्याने येथे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. दुधनी नगराध्यक्ष पदावर भाजपचे भीमाशंकर इंगळे यांनी 121 मतांनी विजयी होऊन नगरपालिकेतील काँग्रेसचा पन्नास वर्षांतील सत्ता पालटली होती. पुन्हा नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.

भाजपमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दुधनी नगरपरिषदेत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. सध्या दुधनी नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. नगरसेवक होण्यासाठी सर्वच पक्षांत इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. सर्वच पक्षांत नगरसेवक होण्यासाठी तरुणवर्ग गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे.

मैंदर्गी नगरपरिषद : पहिल्या टप्प्यात तालुक्यातील मैंदर्गी नगरपरिषद निवडणुकीचा समावेश असल्याने येथील स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. विविध पक्षांच्या व स्थानिक गटांच्या नेत्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत.

मैंदर्गी नगरपरिषदेत एकूण 17 जागा आहेत. गत निवडणुकीत केसूर-शाब्दी गट 10, भाजप 3, गोब्बूर गट 3, तर अपक्षकडे 1 जागा होती. दीप्ती केसूर या नगराध्यक्षा झाल्या होत्या. शाब्दी गट, पाटील गट, बांगी गट व केसूर गटाच्या नगराध्यक्षा दीप्ती केसूर, किरण केसूर, सुरेश दिवटे, तुक्कप्पा नागुरे, बसवराज बेण्णेश्‍वर, शिवशरण बुरकी आदी नेते विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा जनतेसमोर जाणार असल्याचे बोलले जात आहे. दिप्ती केसूर यंनी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. दुसरीकडे आ. कल्याणशेट्टी हे सर्व जागा कमळ चिन्हावर लढणार असल्याचे सांगत आहेत.

आ. कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नेते येत्या नगरपरिषद निवडणुकीसाठी रणनीती आखताना दिसून येत आहेत. इकडे शावरी, गोब्बूर व लुकडे गटाकडूनही नगरपरिषद निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. महेश शावरी एम.एस. फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून मैंदर्गी शहरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवित नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शावरी गटाने जोरदार तयारी केली आहे. काही नेते अपक्ष म्हणूनही नगरपरिषद निवडणुकीत उतरणार असल्याची जोरदार चर्चा मैंदर्गी शहरात सुरू आहे.

राजकीय चर्चेला उधाण
नुकताच निवडणूक आयोगाकडून नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा भाजप सरकारने जनतेतून नगराध्यक्ष निवडणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. जिल्ह्यात अक्कलकोट हा एकमेव तालुका असा आहे की ज्याठिकाणी 3 नगरपालिका आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीची उत्सुकता लागली असून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. संपूर्ण तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Back to top button