पंढरपूरमध्ये चंद्रभागा रेल्वे स्टेशन निर्माण करा | पुढारी

पंढरपूरमध्ये चंद्रभागा रेल्वे स्टेशन निर्माण करा

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  श्रीक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपलीकडे 65 एकरालगत रेल्वेच्या मालकीची 35 एकर जमीन आहे. त्यापैकी काही एकर जागेवर वारकरी व त्या भागातील नागरिकांसाठी चंद्रभागा रेल्वे स्टेशन हे नव्याने निर्माण केल्यास त्याचा फायदा भाविकांना होणार आहे.

65 एकरामध्ये व नदीपूर्व भागात असलेल्या आषाढी यात्रा 450, कार्तिकी यात्रा 350 व इतर यात्रांना 100 दिंड्याना तसेच या भागात सुमारे 100 ते 125 मठ आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने इस्कॉन, गीता मंदिर असे नामांकित मठ व मंदिरे आहेत. शेगाव दुमाला, आढीव, भटुंबरे, देगाव, टेंभुर्णी रस्ता आदी भागात अनेक नवीन मठ निर्माण झाले आहेत.
या सर्व भाविक व नागरिकांना नवीन रेल्वे स्टेशनचा फायदा होईल.त्याचप्रमाणे एकदा या भागात रेल्वे स्टेशन झाल्यानंतर अनेक भाविक जादा संख्येने पंढरीत येतील. त्यामुळे स्थानिकांसह रेल्वे प्रशासनाचे उत्पन्न वाढेल. यामुळे नवीन चंद्रभागा रेल्वे स्टेशनची निर्मिती करा, अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पंढरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.

सध्याच्या रेल्वे स्टेशनवरुन नदीपूर्व भागात भाविकांना येण्यासाठी यात्रेत फार त्रास होतो. रिक्षावाले हे जादा भाडे आकारतात. त्यामुळे गोरगरीब भाविकांची आर्थिक पिळवणूक होते. त्यामुळे 65 एकराजवळ असलेल्या रेल्वेच्या जागेत नवीन चंद्रभागा रेल्वे स्टेशन निर्माण करावे, असे त्यांनी निवेदनात म्हटलेले आहे. या निवेदनाच्या प्रती केंद्रीय रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.

Back to top button