सोलापूर : ऐन पावसाळ्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेबीज इंजेक्शनचा तुटवडा | पुढारी

सोलापूर : ऐन पावसाळ्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेबीज इंजेक्शनचा तुटवडा

सोलापूर;  पुढारी वृत्तसेवा :  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये (सिव्हिल हॉस्पिटल) गेल्या महिन्याभरापासून रेबीज इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बाहेरुन इंजेक्शन आणावे लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त केला जात आहे.

अलीकडे शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. अशा स्थितीमध्ये पावसाळ्यासदेखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाच्या हंगामात कुत्रा चावल्यानंतर त्यावर त्वरित इंजेक्शन घेणे गरजेचे आहे; अन्यथा त्याचे विपरीत परिणाम होतो. हे ओळखून नागरिक सिव्हिल हा सरकारी दवाखाना असल्याचे गृहीत धरुन रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी येत आहेत. मात्र डॉक्टरांकडून रेबीज इंजेक्शन संपले असून बाहेरून आणण्यास रलग्णाला सांगत आहेत. त्यामुळे एका इंजेक्शनाची किंमत बाहेरील 390 रुपयाला असून पाच इंजेक्शन घेण्यासाठी जवळपास दोन हजार रुपये लागतात.

मात्र सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे सरकारी दवाखाना असून सर्वसामान्य रुग्णाला माफक दरात उपचार मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. या वातावरणात आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच रेबीज इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्याभरापासून रेबीज इंजेक्शनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे श्‍वान चावल्यानंतर संबंधित रुग्णाला बाहेरूनच विकत इंजेक्शन आणावे लागणार आहे.
– डॉ. लगदीर गायकवाड
सिव्हिल हॉस्पिटल

शहरातील डफरीन हॉस्पिटलमध्ये रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी गेले असता त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठविले. परंतु सिव्हिलमध्ये आले असता त्यांच्याकडून 900 रुपये मागणी केली जात आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने विकत इंजेक्शन घ्यावे कसे?
– सुशीला गायकवाड
रुग्ण

Back to top button