पाऊस आला आणि पंढरपूर परिसर स्वच्छ झाला | पुढारी

पाऊस आला आणि पंढरपूर परिसर स्वच्छ झाला

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  ऐन आषाढी यात्रेत दशमी, एकादशी व द्वादशीला पावसाची रिपरिप सुरू झाल्यामुळे व्यापार्‍यांसह भाविकांची तारांबळ उडाली होती. लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाल्याने गर्दीमुळे आरोग्य विभागाला कचरा उचलण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे कचराकुंड्या ओव्हरफ्लो झाल्या आहेत. मात्र, रिपरिप पावसामुळे तयार झालेली दलदल, चिखल, घाण मंगळवारी आलेल्या जोरदार पावसामुळे वाहून जाण्यास मदत झाली आहे. त्यामुळे पंढरपुरात उद्भवणारी आरोग्याची समस्या सुटण्यास मदत झाली आहे.  नगरपालिका आरोग्य विभागाकडून दररोज 125 टन कचरा उचलण्यात येत असल्याने येत्या दोन दिवसांत शहर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.

गेले तीन दिवस पंढरपूर शहर व परिसरात पावसाची रिपरिप दिवसरात्र सुरू होती. पावसामुळे रस्ते चिखलमय झाले होते. शहरातील वाहन पार्किंगमध्येही चिखल तयार झाल्याने चिखलात वाहने फसली जात होती. हीच वाहने बाहेर पडताना रस्त्यावर चिखल घेऊन येत होती. यामुळे शहरातील रस्तेही चिखलमय झाले होते. यातून भाविकांना चालताना कसरत करावी लागत होती. पायातील चप्पल, बूट चिखलाच्या राड्याने भरले जात होते. अंगातील कपड्यांवरही चिखलाचे शिंतोडे येत होते. यामुळे भाविकांचे कपडे खराब होत होते. यातच रस्त्यावरची स्वच्छता करता येत नसल्याने रस्ते चिखलमय झाले होते. रस्त्यांवर, गल्लीबोळात पडलेला कचरा भिजला जात असल्याने तो उचलताही येत नव्हता. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी साचलेला कचरा, शिळे अन्न जागेवर पडून राहिल्याने त्याचे ढिगारे साचलेले आहेत. तर कचराकुंड्यादेखील ओव्हरफ्लो झाल्याने बाजूला कचरा पडून दुर्गंधी सुटू लागली होती. यामुळे भाविकांना व स्थानिक नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, विषमज्वर आदी आजारांना सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती.

मात्र, आरोग्य विभागाने 1350 कर्मचार्‍यांमार्फत कचरा उचलण्याचे व स्वच्छता करण्याचे काम करत दुर्गंधी सुटू नये म्हणून नगरपरिषदेकडून जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. यामुळे जरी पावसामुळे दलदल तयार झाली असली तरी कचराकुंड्यांतील कचरा उचलून त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. साथीचे रोग पसरणार नाहीत, याची दखल नगरपरिषद प्रशासन घेताना दिसत आहे.

दशमी, एकादशी व व्दादशी असे तीन दिवस रिमझिम पाऊस सुरू होता, तर मंगळवारी जोरदार पाऊस आल्याने रस्त्यावरील चिखलाचा राडा वाहून गेला आहे. उपनगरीय भागात उघड्यावर भाविकांनी केलेली लघुशंका, शौचही वाहून जाण्यास मदत झाली आहे. सध्या केवळ कचराकुंड्यांतील कचरा व मठालगतचे कचर्‍यांचे ढिगारे उचलणे शिल्लक आहे. गर्दी जसजशी कमी होईल, तसतसे तेथील कचराही उचलण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

चंद्रभागा वाळवंटातील शिळे अन्न, पादत्राणे, फाटके कपडे, निर्माल्य आदींचे ढिगारे तयार करण्यात आले असून गर्दी कमी होताच उचलण्यात येत आहेत. 65 एकर येथीलही कचरा उचलण्याचे काम सुरू असल्याचे मुख्य आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे यांनी सांगितले.

पंढरपूर तालुक्यात दि. 12 रोजी झालेला पाऊस

पंढरपूर शहर-3 मि.मी., कासेगाव 4 मि.मी., भंडीशेगाव 3 मि.मी., पट. कुरोली 5 मि.मी., पुळूज 3 मि.मी., चळे 2 मि.मी., तर तुंगत, भाळवणी, करकंब निरंक.

Back to top button