

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापुरात अपघातात गंभीर जखमी होऊन मेंदू मृत (ब्रेन डेड) झालेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकांनी बकरी ईदच्या दिवशीच त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेऊन मोठी मानव सेवा बजावली.
अपघातात जखमी झालेले मोहम्मद शरीफ बंदेअली शेख हे (वय 56) सोलापूरच्या सीएनएस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. डॉ. प्रसन्न कासेगावकर आणि डॉ.पल्लवी मेहता हे त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र, ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. त्यांचा मेंदू काम करेनासा झाला. त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि तेे ब्रेन डेड होत असल्याचे लक्षात येताच सीएनएस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना परिस्थितीची कल्पना दिली.
पुढील उपचाराबाबत डॉक्टर कासेगावकर यांनी यशोधरा हॉस्पिटलशी संपर्क साधला. हा रुग्ण आता वाचू शकणार नाही, पण या अवस्थेत त्याचे काही अवयव गरजू रुग्णांना दान करता आले तर त्या रुग्णांना जीवदान मिळू शकेल या दिशेने डॉक्टरांनी चर्चा केली. रुग्ण उपचारादरम्यान मेंदू मृत झाला असल्याचे डॉ. विनोद बन, डॉ. विपुल पाठक, डॉ. आशिष भुतडा आणि डॉ. मुक्तेश्वर शेटे या चौघांच्या कमिटीने 9 जुलै रोजी घोषित केले. त्यानंतर यशोधरा हॉस्पिटलमधील अवयव प्रत्यारोपण समन्वयक सुकांत बेळे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले. रुग्णाचे अवयव काढून इतर रुग्णांना बसवले तर ते एक मानवी सेवेचे कृत्य ठरेल, हे त्यांना पटवून देण्यात आले.
रुग्णाचे नातेवाईक सुशिक्षित असल्यामुळे त्यांना ही गोष्ट पटली. त्याच्या नातेवाईकांनी अवयवदानास अनुमती दिली. तपासणीअंती त्याचे यकृत आणि दोन मूत्रपिंडे तसेच दोन डोळे अन्य गरजू रुग्णांस देता येतात, असे आढळून आले. यशोधरा हॉस्पिटलने पुण्याच्या झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटीला कल्पना दिली.
कमिटीने दिलेल्या निर्णयानुसार एक मूत्रपिंड पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील एका नोंदणीकृत रुग्णाला आणि दुसरे मूत्रपिंड यशोधरा हॉस्पिटलमधील नोंदणीकृत गरजू रुग्णाला बसवण्यात आले. रुग्णाचे यकृत पुण्यातील डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधील एका गरजू आणि नोंदणीकृत रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले.
रुग्णाचे दोन डोळे सोलापुरातच दोन रुग्णांना दान करण्यात आले.ही सर्व अवयवदानाची प्रक्रिया 9 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत पार पडली. याकरिता यशोधरा हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. बसवराज कोलूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नीललोहित पैके, डॉ. विनोद बन, डॉ. विपुल पाठक, डॉ. आशिष भुतडा, डॉ. राहुल स्वामी, डॉ. मंजिरी देशपांडे, डॉ. मुक्तेश्वर शेटे, डॉ. प्रीतेश पवार, डॉ. विठ्ठल कृष्ण, डॉ. हेमंत देशपांडे व डॉ. अभिजित भोसले यांनी काम पाहिले. याबरोबरच सुकांत बेळगे, भीमराव देशपांडे, लक्ष्मण साळुंके, शिवशंकर पाटील, हनुमंत मेडशिंगे, राजेश साबळे, लक्ष्मण गायकवाड, डॉ. संदीप लांडगे, डॉ. चेतन, डॉ. अक्षय शेंद्रे, यशपाल भारद्वाज, रवी जोगुरे, सर्व परिचारिका, ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभागातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.
ग्रीन कॉरिडोरसाठी प्रशासनाचे सहकार्य
अवयवदान प्रक्रिया वेगात पार पडावी यासाठी ग्रीन कॉरिडोर निर्माण करण्याच्या कामात पोलिस प्रशासन सोलापूर तसेच पोलिस प्रशासन ग्रामीण आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस यांचे बहुमोल सहकार्य लाभले. डॉ. बसवराज कोलूर यांनी सर्वांचे आभार मानले.