सोलापूर : जिल्हा प्रशासनाने सोडला सुटकेचा नि:श्‍वास…

मिलींद शंभरकर
मिलींद शंभरकर

सोलापूर;  पुढारी वृत्तसेवा :  आषाढी वारीसाठी यंदा नेहमीपेक्षा अधिक गर्दी होणार असल्याने ऐनवेळी नियोजन कोलमडू नये यासाठी जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी डोळ्यात तेल घालून काम करीत होते. अशातच पावसाने जोरदार आगमन केले होते. त्यामुळे वारकर्‍यांची काहीअंशी आबाळ झाली, मात्र अनुचित प्रकार कोठेही घडला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सुटकेचा श्‍वास सोडला असून वारीतून पार पडल्याचे समाधान व्यक्त केले आहे.

शंभरकर म्हणाले, आषाढी वारीसाठी यंदा जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले होते. त्यासाठी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सातत्याने बैठका घेऊन वारीचे नियोजन करण्यात येेत होते.आरोग्य सुविधांपासून ते वाहतूक सुविधा, नदीपात्रातील सुविधा, सुरक्षा यंत्रणा, गर्दीवरील नियोजन, पालख्यांचे आगमन आणि दर्शन रांगा यावर प्रशासनाच्यावतीने योग्य नियेाजन करण्यात आले होते.

मात्र आषाढी वारीसाठी यंदा अपेक्षेपेक्षा अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले होते. मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यानंतर नियोजनासाठी पालकमंत्री अथवा कोणत्याही खात्याचे मंत्री नव्हते. त्यामुळे वारीच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनावरच येऊन पडली होती. यासाठी नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेत्या नीलम गोर्‍हे यांनी अनेकवेळा वारीच्या नियोजनाचा आढावा घेतला होता. मात्र वारी पार पाडण्याची संपूर्ण भिस्त ही जिल्हा प्रशासनावरच होती. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी 24 तास काम करीत होते. पोलिस प्रशासनावर मोठा ताण होता. मात्र उभ्या पावसात ही मंडळी नेमून दिलेल्या ठिकाणी सेवा बजावत होती, याचे समाधान वाटले.

महसूल कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच पंढरपूर नगरपालिकेचे कर्मचारी यांनी या काळात उत्तम काम केले. त्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडता आला. जिल्हाधिकार्‍यांनी वारीच्या कामात ज्या ज्या यंत्रणांनी स्वत:हून चोख जबाबदारी पार पाडली, त्यांचे कौतुक केले तसेच धन्यवाद मानले. आता पावसाचा जोर वाढला असून पंढरपुरात स्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर येणार आहे. त्यासाठी येत्या दोन दिवसांत स्वच्छतेसाठी स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले आहे.

पाऊस कमी झाल्यास सर्वच यंत्रणा पंढरपूरच्या स्वच्छतेसाठी लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्याचा दौरा, व्हीआयपी लोकांचा प्रोटोकॉल, पुजेचे नियोजन तसेच भाविकांची पंढरपुरात होणारी गर्दी यामुळे स्वत:कडेही लक्ष द्यायला वेळ नव्हता, तर अनेक अधिकार्‍यांवर कामाचा मोठा ताण होता. मात्र, जबाबदारीतून कोणाचीही सुटका नव्हती. त्यामुळे सर्वांनीच यासाठी योगदान दिल्याने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आभार मानले.

पंढरीत स्वच्छतेसाठी स्पेशल ड्राईव्हची गरज
वारीनंतर पंढरपुरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणावर होते. सध्या पाऊस सुरु आहे. त्यामुळे स्वच्छतेलाही अडचणी येत आहेत. त्यामुळे पाऊस उघडल्यानंतर पंढरपूर शहरातील स्वच्छतेसाठी स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news