सोलापूर : जिल्ह्यातील राजकीय स्थितीत वेगाने बदल | पुढारी

सोलापूर : जिल्ह्यातील राजकीय स्थितीत वेगाने बदल

सोलापूर;  महेश पांढरे :  नुकताच राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आषाढी वारीनिमित्त सोलापूर दौरा झाला. त्यांच्या दौर्‍यात अनेक राजकीय खलबते पार पडली आहेत. शिंदे यांच्या दौर्‍यानंतर शहरातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत चालली असून अनेकांनी आपली भूमिका बदलली आहे. काही नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर होते ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी इच्छुक झाले आहेत, तर काही मंडळी आता राष्ट्रवादी सोडून थेट काँग्रेसच्या मार्गावर वळली आहेत. त्यामुळे शिंदे यांचा दौर्‍याचा फटका थेट राष्ट्रवादीला बसला आहे.

सोलापूर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील जवळपास 9 नगरपंचायती आणि 1 जिल्हा परिषद, तर 11 पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती. त्यासाठी शहरातील महेश कोठे, आनंद चंदनशिवे यांना राष्ट्रवादीने मोठी ऑफर दिली होती. त्यामुळे हे दोघेही लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी परिस्थिती होती. मात्र, महेश कोठे यांनी अचानकच मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. प्रसार माध्यमांवर ही बातमी येताच महेश कोठे यांनी मोठी सारवासारव केली असून आपण राष्ट्रवादीतच जाणार, अशी भूमिका स्पष्ट केली.
दुसरीकडे, शिवसेना सत्तेत होती, त्यामुळे अनेकांनी उमेदवारीसाठी शिवसेनेकडे फिल्डिंग लावली होती. मात्र, अचानक राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून त्याचे पडसाद आता सोलापूर जिल्ह्यातही उमटू लागले आहेत.

शिंदे समर्थकांनी शिवसैनिकांची उचलबांगडी करायला सुरुवात केली होती. त्या दरम्यानच शिंदे यांचा सोलापूर दौरा पार पडला आहे. या दौर्‍यात अनेक शिंदे समर्थक आता उघडपणे शिंदे गटात यायला तयार झाले आहेत. त्यामुळे सोलापूर शहर शिवसेनेची अवस्था ऐन निवडणुकीच्या तोंडावर दयनीय झाली आहे. ऐन निवडणुकीत शिवसेनेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून होत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे अमोल शिंदे, नगरसेवक मनोज शेजवाळ जर एकनाथ शिंदे गटात सामील झाले, तर ऐन निवडणुकीत शिवसेना मात्र पुरतीच उघडी पडणार असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातही आता आ. तानाजी सावंत यांनी शिवसेनेला शह देण्याची तयारी चालविली आहे. सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे गट मोठा करण्याची तयारी आता त्यांच्याकडून सुरू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, एकंदरीतच मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोलापूर दौर्‍यानंतर सोलापूर शहर व जिल्ह्यातील राजकारणाला चांगलीच कलाटणी मिळाली असून अनेक राजकीय मंडळींनी आपली राजकीय भूमिका बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये याचा निश्‍चित परिणाम दिसून येणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेना, राष्ट्रवादी जिल्ह्यातही गोत्यात आल्या आहेत.

अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचा फटका मूळ शिवसेनेला आणि राष्ट्रवादीलाच बसणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे धाबे दणाणले असल्याचे यावरून दिसून येत आहे. अनेकांनी आता मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संपर्क वाढविला असून निदान राजकीय संधी नाही किमान आपली कामे तरी सुरळीत व्हावीत, असा कयास काढला आहे.

शिंदे गटाच्या भूमिकेविषयी प्रश्‍न
येणार्‍या जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट काय भूमिका घेणार, त्यांच्या गटाच्या राजकीय भवितव्याचे काय? त्यांच्या कार्यकर्त्यांना या निवडणुकांमध्ये संधी मिळणार की नाही, भाजपसोबत त्यांची युती राहणार की पाठिंबा असणार? असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. त्याविषयी बोलण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे सध्यातरी अधिकृत प्रवक्ता जिल्ह्यात नाही. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाची नेमकी भूमिका काय, हा सवाल गुलदस्त्यात आहे.

Back to top button