शिवसेना ठाकरे कुटुंबीयांच्याच पाठीशी : अभंगराव | पुढारी

शिवसेना ठाकरे कुटुंबीयांच्याच पाठीशी : अभंगराव

सोलापूर;  पुढारी वृत्तसेवा :  कोणीही कुठेही गेले तरी सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राहणार आहे, असे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे समर्थक गटाने पंढरपुरात रविवारी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेनेने रविवारी सोलापुरात बैठक घेऊन शिंदे गटाला प्रत्युत्तर दिले. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीच्या वेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पंढरपूरचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, माढ्याचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, दीपक गायकवाड, प्रा. अजय दासरी, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते.

अभंगराव म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही अनेक संकटे आली. परंतु, अशा संकटांना भीक न घालता ते जोमाने उभे राहिले आणि शिवसेनेचा विस्तार केला. शिवसैनिकांना हाच संघर्षाचा वारसा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे आजी – माजी पदाधिकारी एकत्र येऊन शिवसेनेनेला भरारी द्यावी. माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे म्हणाले, शिवसेना संपवण्याची ताकद बंडखोरांमध्ये नाही.

याप्रसंगी पंढरपूरचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, माढ्याचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, दीपक गायकवाड, प्रा. अजय दासरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.

Back to top button