पंढरपूर : विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी | पुढारी

पंढरपूर : विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : 

तुझे दर्शन व्हावे आता ।
तू सकल जणांचा दाता ॥
घे कुशीत गा माऊली ।
तुझ्या पायरी ठेवतो माथा ॥
असे हृद्य स्वर म्हणत चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा करत लाखो भाविकांच्या हरिनामाचा जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली. कोरोनानंतर दोन वर्षांनी भरलेला निर्बंधमुक्‍त आषाढी एकादशीचा सोहळा लाखोे भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. दहा लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावल्याने पंढरीत वैष्णवांची मांदियाळी दिसून आली.

मजल दरमजल करत मानाच्या पालख्यासह विविध संतांच्या पालख्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत आले. भाविकांमुळे मठ, मंदिरे, धार्मिक शाळा, संस्थाने गजबजून गेली होती. 65 एकर येथील भक्‍तिसागर, रेल्वे मैदान, उपनगरीय भागातही भाविक राहुट्या, तंबू उभारून वास्तव्य करत आहेत. भजन, कीर्तन, प्रवचनात महाराज मंडळी तर ऐकण्यात भाविक दंग झाले होते. पंढरपुरात प्रचंड गर्दीमुळे असंख्य भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नानानंतर मुखदर्शन व कळस दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. तितकीच गर्दी रांगेत उभारून पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी झाली होती.

मंदिर समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या दर्शन रांगेत सुमारे सव्वा लाख भाविक प्रतीक्षा करत होते. दर्शन रांग पत्राशेडच्या बाहेर पडून गोपाळपूरमध्ये दाखल झाली होती. यावेळी पावसाने हजेरी लावली तरी वारकर्‍यांनी त्याचा आनंद घेत दर्शनासाठी रांगेत राहणे पसंद केले. दर्शन रांगेतील भाविकांना दर्शन मिळण्यास सुमारे 12 तासांचा अवधी लागत आहे.
65 एकर येथे सुमारे अडीच लाख भाविक वास्तव्य करत असून येथे वीज, पाणी, शौचालये, प्रथमोचार केंद्र, तसेच पोलिस सेवा पुरवण्यात आल्याने भाविकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.

तंबू, राहुट्यांमधून भजन, किर्तन, प्रवचनाच्या सुरू असलेल्या जागरानेही भाविक भक्तीत दंग झाले होते.
आषाढीच्या यात्रेसाठी आलेल्या वारकर्‍यांची पहाटेपासूनच चंद्रभागा नदीत स्नानासाठी गर्दी झाली होती. स्नानानंतर दर्शन घेऊन भाविक प्रसाद, कुंकूबुक्का, अगरबत्ती खरेदीकडे वळत असल्याचे दिसले. यामुळे मंदिर परिसरातील दुकाने ग्राहकांनी गजबजून गेली. व्यापारउदीम बर्‍यापैकी होत असल्याचे दिसून आले. तरी खर्‍या अर्थाने उद्या व्दादशीदिवशी व्यापार अधिक होईल, अशी माहिती स्थानिक व्यापार्‍यांनी दिली.

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठुरायाचा रथ काढला जातो. या रथावर खारका व खोबरे उधळली जातात. असंख्य भाविकांना थेटपणे विठुरायाचे दर्शन होत नाही. त्यांना दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष देवच रथयात्रेच्या माध्यमातून दर्शन देतात अशी भाविकांची धारणा असते. या रथालाही भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

पोलिस सुरक्षेमुळे यंदाच्या आषाढी यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यंदा प्रथमच जिल्हा पोलीस विभागाकडून माऊली स्कॉड ही संकल्पना राबवण्यात आली. चोर्‍या रोखण्यासाठी दामिनी पथक तैनात होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री महापूजेला आल्याने विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली होती. सुमारे 5 हजार अधिकारी व पोलीस कर्मचारी यात्राकरीता तैनात करण्यात आलेले आहेत.
पाच ठिकाणी आपत्तीकालीन विभाग कार्यरत ठेवला होता. भाविकांना काही अडचण आल्यास त्वरित संपर्क करता येत होता. आरोग्य कर्मचारी, आरोग्य पथके तैनात असल्याने वेळीच भाविकांना औषधोपचार करण्यात येत होते.

आषाढी यात्रेकरीता यंदा विशेष रेल्वे गाड्या पंढरपूरपर्यंत सोडण्यात आल्या आहेत. सुमारे साडेचार हजार एसटी बसेस भाविकांच्या सेवाकरीता धावत आहेत. शहराबाहेर तात्पुरती चार बसस्थानके तयार करण्यात आली असून त्या त्या विभागाकडे बसेस मार्गस्थ करण्यात येत आहेत. यात्रेदरम्यान शहराबाहेरुन जड व अवजड वाहतूक वळवण्यात आलेली आहे. त्यामूळे यावेळेस वाहतूक कोंडीची मोठी समस्या जाणवली नाही.

पावसामूळे भाविकांची तारांबळ उडाली होती. मात्र एकादशी दिवशी पावसाने दिवसभर उघडीप घेतल्याने भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रासादिक साहित्य व इतर जीवनावश्यक साहित्याच्या दुकाने, स्टॉलवर भाविक मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत. यामूळे यंदा बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढालीचा अंदाज व्यापार्‍यांकडून व्यक्‍त करण्यात आला.

Back to top button