पंढरपूर : संत तुकाराम महाराज कोकण दिंडीला ‘निर्मल दिंडी’चा प्रथम पुरस्कार प्रदान | पुढारी

पंढरपूर : संत तुकाराम महाराज कोकण दिंडीला ‘निर्मल दिंडी’चा प्रथम पुरस्कार प्रदान

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :   पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणार्‍या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन ‘निर्मल वारी, हरित वारी’ अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा, या उद्देशाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल, जि. रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह) यांनी पटकावले आहे.

‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारामध्ये द्वितीय क्रमांक वै.ह.भ.प. भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी, मु.पो.शेरा, ता. रेणापूर, जि. लातूर (75 हजार व सन्मानचिन्ह), तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक, जि. नाशिक (50 हजार व सन्मानचिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. तसेच ‘ग्रीन बिल्डिंग’ पुरस्काराचे वितरणही यावेळी करण्यात आले.

प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे यांचा विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले. आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज यांनी मानले.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, बंडू जाधव, आमदार दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरत गोगावले, रवींद्र फाटक, राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

Back to top button