सोलापूर : जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हटवत तानाजी सावंतांना ठाकरेंचा झटका | पुढारी

सोलापूर : जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हटवत तानाजी सावंतांना ठाकरेंचा झटका

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  माजी मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन हटविण्यात आले आहे. तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परंडा मतदारसंघांचे आमदार आहेत.

एकनाथ शिंदे गटातील नेत्यांना शिवसेनेपासून दूर ठेवण्याचा पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांची सोलापुरचे नवे संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांची हकालपट्टी करत नवे युवा सेना जिल्हाप्रमुख म्हणून बालाजी चौगुले यांची नियुक्ती केली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार अचानक पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने सरकार स्थापन झाले आहे. लवकरच या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

सोलापुरातील माजी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि माजी शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतल्यास तानाजी सावंत हे सोलापूरचे पालकमंत्री होऊ शकतात, असा विश्‍वासही व्यक्‍त करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांनी गद्दार शिवसैनिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विजय चौगुले, विजय नाहटा या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अर्जुन खोतकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक पदाधिकार्‍यांची वरिष्ठ पदावर नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते.

Back to top button