पंढरपूर : आषाढी यात्रेत संततधार पावसामुळे भाविकांची तारांबळ | पुढारी

पंढरपूर : आषाढी यात्रेत संततधार पावसामुळे भाविकांची तारांबळ

पंढरपूर ;  पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण जून महिना गायब झालेला पाऊस ऐन आषाढी यात्रेत सुरू झाला आहे. दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्‍तीत तल्लीन झालेले भाविक कोसळणार्‍या पावसानेही आलेचिंब झाले आहेत. पावसाची संततधार सुरू असल्यामूळे भाविकांसह व्यापार्‍यांची तारांबळ उडाली आहे. हातात भगवी पताका, हातात टाळ, विना घेऊन येणारे वारकरी पावसामूळे हातात छत्र्या घेवून, रेनकोट घेऊन येत असल्याचे दिसत आहेत.

आषाढी यात्रेचा एकादशीचा मुख्य सोहळा आज रविवार, दि. 10 रोजी साजरा होत आहे. या सोहळ्याकरीता संतांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. तर राज्यभरातून आलेले भाविकदेखील लाखोंच्या संख्येने दाखल झाले असल्याने मठ, मंदिरे, संस्थाने भाविकांनी फुलून गेली आहेत. तर मंदिर परिसर, 65 एकर, दर्शन रांगेतही भाविक लाखोंच्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून येते. कोरोनानंतर प्रथम पायी पालखी दिंडी आषाढी सोहळा साजरा होत आहे.त्यामूळे गेल दोन वर्षे श्री विठ्ठल रुक्मिणीच्यां दर्शनाला मुकलेले लाखो भाविक यात्रेला आले आहेत. भाविकांच्या उपस्थितीने पंढरपूरनगरी जबजली आहे.

दहा लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झालेले आहेत. मात्र, दिवसभर पाऊस सुरू असल्याने भाविकांची तारांबळ उडाली असून बहुतांश भाविकांनी बाहेर पडणे टाळले आहे. याचा परिणाम म्हणून यात्रा म्हणावी तशी भरलेली दिसून येत नाही. मात्र, पाऊस उघडत नसल्याने भर पावसातही भाविक रेनकोट, छत्री घेवून बाहेर पडताना दिसून येत आहेत. पाऊस सुरु असल्याने बहुतांश रस्त्यांवर गर्दी कमी दिसून येत आहे. पाऊस नसताना मात्र या रस्त्यांवरून चालणे गर्दीमूळे मुश्कील होऊन जाते. तेच रस्ते पावसामुळे विरळ गर्दीचे दिसून येत आहेत. हातात भगवी पताका, हातात टाळ, विना घेऊन जाणारे वारकरी पावसामुळे हातात छत्र्या घेवून, रेनकोट घेऊन जात असताना दिसत आहेत.

भीज पावसामुळे सखल भागात चिखल तयार झाला आहे. तर राहुठ्या उभारलेल्या ठिकाणीदेखील चिखल तयार झाला असून, पाणी साचत असल्याने भाविकांची तारांबळ उडत आहे. तर पावसात भाविक बाहेर पडत नाहीत. बाहेर आले तर खरोदी करण्यास थांबत नसल्याने मोठ्या आशेने प्रासादिक साहित्य व विविध साहित्यांची दुकाने, स्टॉल थाटलेले व्यापारी चिंताग्रस्त झालेले आहेत. तर गेली महिनाभर पावसाने दडी मारल्याने चिंताग्रस्त झालेले शेतकरी मात्र समाधान व्यक्त करत आहेत. यात्रेत आलेले बहुतांश भाविक हे शेतकरी आहेत. त्यामुळे पाऊस पाणी पडू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे, अशी विनवनी श्री विठ्ठल रुक्मिणीकडे करत आहेत.

Back to top button