पंढरपूर : पंढरीतील सेना पदाधिकार्‍यांच्या घरी होणार मुख्यमंत्र्यांचा फराळ | पुढारी

पंढरपूर : पंढरीतील सेना पदाधिकार्‍यांच्या घरी होणार मुख्यमंत्र्यांचा फराळ

पंढरपूर;  पुढारी वृत्तसेवा :  आषाढी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. पंढरपूर येथे आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख महेश साठे यांच्या घरी विसावा घेणार आहेत. याचवेळी ते फराळ करणार असल्याची माहिती महेश साठे यांच्याकडून देण्यात आली आहे.

राज्यातील शिवसेनेचा मोठा गट भाजपाबरोबर गेला आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. शिवसेनेत असल्यापासूनच महेश साठे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर घनिष्ठ संबंध होते. जिल्हा उपाध्यक्षपदाचा काळ संपूनही महेश साठे यांचा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चांगला संपर्क होता.

एकनाथ शिंदे यांचे सोलापूर जिल्ह्यातील निकटवर्तीय म्हणून महेश साठे यांचा नावलौकिक आहे. मुख्यमंत्री म्हणून श्री विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले. यानंतर लगेचच महेश साठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाऊन भेट घेतली. त्यांच्या पंढरपूर दौर्‍यात फराळासाठी घरी येण्याची विनंती केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ यास मान्यता दिली. त्यामुळे सुदाम्याचे आमंत्रण श्रीकृष्णाने स्वीकारल्याचा आनंद आपणास झाल्याची प्रतिक्रिया महेश साठे यांनी दिली आहे.

पंढरपूरमधील लक्ष्मीटाकळी रोडवर महेश साठे यांचे निवासस्थान आहे. महेश साठे यांच्या या आमंत्रणामुळे जिल्ह्यातील शिवसेनेत खळबळ उडाली आहे. महेश साठे यांना मानणारा जिल्ह्यात मोठा गट शिवसेनेत कार्यरत आहे. महेश साठे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सलगी जिल्ह्यातील शिवसेनेसाठी धोकादायक तर ठरणार नाही ना, अशी परिस्थिती शिवसेनेच्या गोटात निर्माण झाली आहे.

Back to top button