पंढरपूर : वैष्णवांच्या सेवेसाठी भाळवणी आरोग्यवर्धिनी केंद्र सज्ज | पुढारी

पंढरपूर : वैष्णवांच्या सेवेसाठी भाळवणी आरोग्यवर्धिनी केंद्र सज्ज

भाळवणी; नितीन शिंदे :  आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व देहू येथून जगद्गुरू तुकाराम महाराज या मोठ्या पालखी सोहळ्यांबरोबर इतर अनेक पालखी सोहळे पंढरपूरच्या दिशेने पायी चालत येत आहेत. संतांच्या पालख्यांचा भंडीशेगाव व पिराची कुरोली या ठिकाणी पहिला मुक्काम असतो. या पालखी सोहळ्यामधील वैष्णवांच्या सेवेसाठी भाळवणी (ता. पंढरपूर) येथील भाळवणी आरोग्यवर्धिनी केंद्र सज्ज झाले आहे.

भाळवणी व पालखीतळ परिसरातील विहिरी, बोअर असे 179 पाण्याचे स्त्रोत तपासणी केले आहेत. त्याचबरोबर दूषित 190 ठिकाणचे पाणी शुद्धीकरण करुन तेथील डासअळी सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य केंद्राकडून पाणी शुद्धीकरणासाठी टीसीएल उपलब्ध झाले असून आरोग्य कर्मचार्‍यांकडून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांमार्फत पाण्याचे सर्व स्त्रोत शुद्धीकरण करण्यात आले आहेत.

पिराची कुरोली परिसरात 80 ठिकाणी पाण्याचे टँकर भरण्याची सोय केली असून पाणी शुद्धीकरण्यासाठी प्रत्येक ठिकाणी 5 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना तत्काळ औषधोपचार व्हावा म्हणून भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्र, पिराची कुरोली फाटा, तुकाराम महाराज पालखीतळ, ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ, भंडीशेगाव उपकेंद्र, तिरंगा हॉटेल या सहा ठिकाणी औषधोपचार केंद्र उभारण्यात आले असून तुकाराम महाराज पालखीतळ येथे आयुर्वेदिक उपचार केंद्र उभारण्यात आले आहे.

या सर्व उपचार केंद्रांवर 2 वैद्यकीय अधिकारी, 8 समुदाय आरोग्य अधिकारी, 40 आरोग्य सेवक, 20 आरोग्य सेविका, 60 आरोग्य सहायक कार्यरत असणार आहेत. ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर 102 रुग्णवाहिका 3 व 108 रुग्णवाहिका 6 व भाळवणी आरोग्य केंद्रामधील एक अशा 10 रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर टू व्हीलर आरोग्यदूत कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती भाळवणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित रेपाळ यांनी दिली.

Back to top button