पंढरपूर : 65 एकरांतील भक्तिसागरात भाविकांचा निवारा | पुढारी

पंढरपूर : 65 एकरांतील भक्तिसागरात भाविकांचा निवारा

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  रविवार 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. कोरोनानंतर प्रथमच निर्बंधमुक्तपणे सोहळा पार पडत असल्याने भाविकांची संख्या वाढणार आहे. येणार्‍या दिंड्या, पालख्या यानां राहुट्या,तंबू उभारुन निवासाची सोय व्हावी. म्हणून प्रशासनाच्या वतीने भक्तिसागर 65 एकर येथे मोफत जागा(प्लॉट), वीज, पाणी, शौचालये, आरोग्यसेवा, पोलिस संरक्षण पुरवण्यात येत आहे. यामुळे येथील सर्वच्या सर्व 480 प्लॉटचे बुकिंग पूर्ण झाले असून भाविक तंबू, राहुट्या उभारुन वास्तव्य करू लागले आहेत.

शहरावरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शहराबाहेर नदीच्या पैलतीरी 65 एकर जागेत भाविकांसाठी जागा मोकळी ठेवून राहुट्या, तंबू उभारण्याची सोय केलेली आहे. येथील स्वच्छता करण्यात आली असून 480 प्लॉट तयार करण्यात आले होते. हे सर्वच्या सर्व प्लॉट बुकिंग पूर्ण झाले आहे. जसजसे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज , एकनाथ महाराज व अन्य संतांच्या पालख्या पंढरीच्या समीप आल्या आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, दर्शन रांग येथे भाविकांची गर्दी दिसून येते.

65 एकर येथे भाविकांच्या सुविधेसाठी आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्र उभारण्यात आले आहे. या माध्यमातून 480 प्लॉटचे बुकिंग पूर्ण झाले आहे. तर भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यात येत असल्याचे नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी सांगितले.

Back to top button