सोलापूर : सत्तापिसाटांनी जनतेशी द्रोह केला : डॉ. नारकर | पुढारी

सोलापूर : सत्तापिसाटांनी जनतेशी द्रोह केला : डॉ. नारकर

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  केंद्रातील भाजप सरकार सत्तापिसाट बनले असून, सीबीआय, एसआयटी, ईडी आदी तपासयंत्रणांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना दबावाद्वारे पक्षांतरास भाग पाडत असून, सत्ता हस्तगत करीत आहेत. महाराष्ट्रात नुकतेच भाजपने केलेले सत्तांतर ही लोकशाही पायदळी तुडवणारी घटना असून महाराष्ट्र जनतेशी केलेला द्रोह आहे, अशी प्रखर टीका ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे शिवछत्रपती रंगभवन येथे झालेल्या व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार नरसय्या आडम अध्यक्षस्थानी होते. यावेळी आडम म्हणाले की, मार्च 1978 साली शरद पवारांनी पुलोद आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर हे सरकार पाडण्यासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी प्रलोभने दाखवून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण, त्यास मी जुमानलो नाही. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात नुकतेच झालेले सत्तांतर म्हणजे केवळ मंत्रीपद, खुर्चीसाठी झालेल्या कोलांट उड्या आहेत.

पक्ष, विचार आणि तत्त्वांना तिलांजली देऊन पक्षांतर करुन सत्तेत आलेल्या आमदारांना जनता माफ करणार नाही. भाजप सरकार दिवसाढवळ्या लोकशाही बाजूला ठेऊन मनुस्मृतीचे राजकारण रुजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न दिसत आहे. राज्य सरकारची स्वायत्तता आणि सार्वभौमत्वाला पायदळी तुडविणारे सरकार जनतेने पाडले पाहिजे.

प्रारंभी जिल्हा सचिव एम.एच. शेख यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, युसूफ शेख, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, अब्राहम कुमार, रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे, व्यंकटेश कोंगारी, म. हनीफ सातखेड, अनिल वासम आदींची उपस्थिती होती.

.

Back to top button