सोलापूर : संतश्रेष्ठ तुकोबारायांचे पहिले उभे रिंगण उद्या; माळीनगर परिसर स्वागतासाठी सज्ज | पुढारी

सोलापूर : संतश्रेष्ठ तुकोबारायांचे पहिले उभे रिंगण उद्या; माळीनगर परिसर स्वागतासाठी सज्ज

माळीनगर; गोपाळ लावंड :  ओढ पंढरीची। ओढ आषाढीची॥
जय जय विठ्ठल। जय हरी विठ्ठल॥
गत दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर जगद‍्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी अकलूज मुक्काम घेऊन बुधवारी, 6 जुलै रोजी माळीनगरमध्ये सकाळी 8 वाजता येत आहे. संत तुकाराम महाराज पालखीचे पहिले उभे रिंगण डोळ्यात साठवण्यासाठी लाखो वैष्णव माळीनगर नगरीत जमतील. हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ डोळ्यात साठवण्यासाठी माळीनगर व परिसरात उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी व ग्रामपंचायत माळीनगर परिसरातील विविध संस्था व माळीनगरवासीयांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

मॉडेल हायस्कूलच्या भव्य मैदानात वारकर्‍यांच्या विसाव्यासाठी तयारी केली आहे. घरोघरी वारकर्‍यांना प्रसाद भोजनाची सोय केली आहे. पालखी जसजशी पुढे सरकते, येणारे वारकरी सुद्धा वाट उरकण्यासाठी पुढील गावाचा धावा घेताना दिसतात. सासवड माळी शुगर फॅक्टरीतर्फे वारकर्‍यांना मिष्ठान्न प्रसाद भोजनाची व्यवस्था केली आहे. महात्मा फुले पतसंस्था, माळीनगर मल्टिस्टेट सोसायटी, माळीनगर यांच्यावतीनेसुद्धा वारकर्‍यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्यावतीने शुद्ध पाण्याची व्यवस्था तसेच येणार्‍या वारकर्‍यांना मोफत आरोग्य सुविधा, सुरक्षा विभागातर्फे चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. माळीनगर ग्रामपंचायतीच्यावतीने परिसर स्वच्छता, फवारणी त्याचप्रमाणे जनसेवा संघटना, आकाश राऊत मित्रपरिवार यांच्या वतीनेसुद्धा वारकर्‍यांना भोजन व्यवस्था आणि अल्पोपाहाराची सोय केली आहे.

परिसरातील अनेक राजकीय, सामाजिक, सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी वारकर्‍यांना अनेक मोफत सुविधा पुरविण्यात येतात.
तुकाराम महाराज यांच्या पालखीनिमित्त गावात मोठ्या जत्रेचे स्वरुप येते. यावेळी भक्तांच्या पिण्याचे पाणी, मोफत आरोग्य सुविधा, तातडीची मदत यासाठी प्रशासकीय यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र माळीनगर कर्मचारी सज्ज झाले आहेत. एकंदरीत सर्व अबालवृद्ध, महिला, नागरिक या सर्वाना संत तुकोबारायांच्या पालखीची आतुरता लागली आहे.

Back to top button