

सोलापूर , पुढारी वृत्तसेवा : एकीकडे कुपोषणाचे प्रमाण कमी होत असल्याचे प्रशासन सांगत असलेतरी सध्या जिल्ह्यात बालमृत्यूंचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील जवळपास 1 हजार 318 बालकांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात आधुनिक यंत्रणा आणि सोयी-सुविधांचे प्रमाण वाढले आहे. विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जात आहे. मात्र, ग्रामीण भागात होत असलेल्या बालमृत्यूंमुळे कुपोषणाची परिस्थिती 'जैसे थे'च असल्याचे सिद्ध होत आहे.
विशेषतः जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात गेल्या वर्षभरात सर्वाधिक 111 बालमृत्यू झाले आहेत. सध्याही बालमृत्यूंचे प्रमाण कमी झालेे नाही. सरकारी यंत्रणेकडे असलेली अपुरी यंत्रणा आणि मनुष्यबळ, बालकांची अपुरी वाढ, आजारी माता, गर्भाशयातील संसर्ग, रोगप्रतिकारशक्ती कमी असणे, कुपोषित माता आदी कारणे बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत. बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून कॅल्शियमच्या गोळ्या, लोहाची मात्रा वाढविणारे औषध, व्हिटॅमिनचे ठराविक डोसही दिले जात असल्याचे सांगण्यात आले. विशेषतः महिलांच्या गर्भधारणेच्या वेळी महिला बालकल्याण विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जाते. मात्र, तरीदेखील गरोदरपणामध्ये मुलांची काळजी न घेतल्याने बालमृत्यूंचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यात बालमृत्यूंचे प्रमाण वाढल्याचा अहवाल जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचा आहे. तो अहवाल आरोग्य यंत्रणेचा नाही.
– डॉ. प्रदीप ढेले,
जिल्हा शल्यचिकित्सक
तालुकानिहाय बालमृत्यू
अक्कलकोट-111, बार्शी-39, वैराग -36, करमाळा – 35, माढा – 39, कुर्डूवाडी-टेंभुर्णी – 24, माळशिरस -64, अकलूज – 44, मंगळवेढा – 51, मोहोळ – 67, उत्तर सोलापूर – 46, पंढरपूर – 79, सांगोला – 9, कोळा -20, दक्षिण सोलापूर – 77, एकूण 741.
164 बालकांचा अधिक मृत्यू
मागील वर्षी जिल्ह्यात एकूण 577 बालमृत्यू झाले आहेत, तर यंदा 741 बालमृत्यू झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा 164 बालकांचा अधिक मृत्यू झाला. चालू महिन्यामध्येच 52 बालकांचा मृत्यू झाला आहे.