पुणे : ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दोन दिवस पुण्यात विसावला आहे. या सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामाला आहेत. या पाहुण्यांच्या खातरदारीसाठी पुणेकरांनी औदार्याचे सर्व दरवाजे खुले केले आहेत. पुणेकरांच्या दानशूरपणाविषयी काय बोलावे? किती बोलावे? जेवढे बोलेल तेवढे कमी पडेल, अशी परिस्थिती आहे. माऊलीने भक्तांच्या सेवेसाठी आपले घरदार, अपार्टमेंट, पार्किंग जागा तसेच मंदिरे आणि धर्मशाळांचे दरवाजे खुले केले आहेत. या ठिकाणी वारकरी पाहुणचार घेत आहेत. खरंच, पुण्याची गणना कोण करी!' असे म्हणण्याऐवजी पुणेकरांच्या मोठेपणाची गणना कोण करी? असेच म्हणावे लागेल.
सुमारे अडीच ते तीन लाख लोक पुण्यात मुक्कामी आहेत. परंपरागत नियमानुसार माऊलींच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेत असतो. सुरुवातीला कमी वारकरी संख्या असताना या परिसरात वारीमध्ये सहभागी असलेले वारकरी राहात असत. तेव्हा वारीमध्ये येणार्यांची संख्या हजारात होती, ती आता लाखांवर गेली आहे. फक्त नाना पेठेतील मंदिरे, धर्मशाळा, खासगी जागा याठिकाणी वारकर्यांना जागा पुरेशी होत नाही. त्यामुळे वारकरी पुणे उपनगर, पिंपरी-चिंचवड, कात्रज, हडपसर अशा मिळेल त्या जागी राहतात. काही वारकरी नातेवाईकांकडे जातात आणि तिसर्या दिवशी पुन्हा वारीत सहभागी होतात.
शहरात आलेले वारकरी म्हणजे पुणेकरांसाठी माऊलीच असतात. या माऊलींच्या सेवेसाठी अनेक जणांनी आपल्या घरासमोरील मोकळी जागा, अपार्टमेंट पार्किंग, कॉमन हॉल तसेच सोसायटींमधील मंदिरे, धर्मशाळा, पार्किंगची जागा खुल्या केल्या आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंगची कामे सुरू आहेत. अशा ठिकाणीही वारकर्यांना मुक्काम करण्यासाठी काही बिल्डरांनी जागा मोकळी करून दिली आहे.
मोकळ्या जागेत दिसेल तिथे वारकरी मुक्काम करत आहेत. त्यांना कोणीही अडवत नाही. उलट त्यांचे आदराने स्वागत करून त्यांना त्या विभागातील सेवाभावी संस्था, गणेश मंडळे आणि सामाजिक ट्रस्ट यांनी पाणी आणि शौचालयाची सोय उपलब्ध करून दिली आहे. जिकडे पाहावे तिकडे वारकरी दिसत आहेत आणि या वारकर्यांच्या सेवेसाठी पुणेकर ना कधी कमी पडले आहेत, ना कधी कमी पडतील.
नाना पेठेत जैन धर्म आणि हिंदू धर्मशाळांमध्ये वारकरी मुक्कामाला आहेत. वर्षांनुवर्षे पंढरीची वारी करणारे अनेक आहेत. त्यांची मुक्कामाची ठिकाणेही निश्चित आहेत. त्यांच्या सेवेसाठी धर्मशाळेतील सर्व स्टाफ आनंदाने सहभागी असतो. विजू शेठ परमार नावाचे एक व्यापारी आम्हाला नाना पेठेत भेटले.
त्यांनी वारकर्यांच्या सेवेसाठी तीन हजार मिसळपावचे नियोजन केले होते. परमार यांना दोन मुली आहेत. दोघींची लग्ने झाली आहेत. त्यांचा शहरात एक व्यवसाय आहे. वर्षभरात मिळवलेली 25 टक्के कमाई मी वारकर्यांसाठी देत असतो. गेल्या वीस वर्षांपासून मी ही सेवा देत आहे. मला माऊलींनी काही कमी पडू दिले नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुणेकरांनी जी सेवा दिली आहे, त्याचे शब्दांत आभार मानणे अवघड आहे. मात्र, या सेवेचा मेवा त्यांना निश्चित मिळेल, अशा शुभेच्छा अनेकांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिल्या.
सतीश मोरे