तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर बसस्थानकाची दुरवस्था | पुढारी

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर बसस्थानकाची दुरवस्था

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा :   महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा तीर्थक्षेत्र असणार्‍या तुळजापुरातील जुन्या बसस्थानकामध्ये पहिल्याच पावसात पाण्याचे डबके झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. राज्य सरकारचा लाखो रुपयांचा निधी खर्च करूनदेखील भाविक भक्तांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची तक्रार होत आहे. ही परिस्थिती तुळजापूर विकास प्राधिकरणाचे अपयश दाखवणारी आहे.

तीर्थक्षेत्र असणार्‍या तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकामध्ये खूप मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी आहे. सोलापूर, पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर येथून धावणार्‍या शेकडो बसेस या बसस्थानकामधून चालतात. त्यामुळे येथे प्रवाशांची आणि भाविक भक्तांची खूप मोठी गर्दी आहे.

राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवल्यानंतरच्या काही वर्षार्ंत जुन्या बसस्थानकाचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र आहे. येथे सर्वत्र मातीचे ढिगारे आणि खड्ड्यांनी बसस्थानक व्यापलेले आहे. सोमवारी दुपारी अल्पसा पाऊस झाला आणि बसस्थानकामध्ये
पाणी मोठ्या प्रमाणात साचले. जेथे प्रवासी उभे राहतात तेथे पाणी राहिल्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. पाऊस पडल्यानंतर येथे पाण्याचे डबके आणि मातीचा चिखल झाला आहे. त्यामुळे हा चिखल बसस्थानकाच्या सर्व परिसरात पसरला आहे.
मोठे आर्थिक उत्पन्न देणारे हे तुळजापूर आगार असून विभागीय कार्यालयाकडून आणि तुळजापूर विकास प्राधिकरणाकडून बसस्थानकामध्ये येणार्‍या भाविकांची सोय करण्यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत.

पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे भाविकांना दुकानामधील पाणी विकत खरेदी करावे लागते. भाविकांना बसण्यासाठी बसस्थानकामध्ये अपुरी व्यवस्था आहे. मोबाईल चार्जिंग करण्याची कोणतीही सुविधा या बसस्थानकामध्ये उपलब्ध नाही. स्वच्छतागृह अत्यंत अपुरे असल्यामुळे अनेक भाविक भक्त बसस्थानकाच्या इतर जागेचा उपयोग करतात. तीर्थक्षेत्राला साजेशी कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे स्थानिक नागरिक आणि ग्रामीण भागांतून येणारे प्रवासी देखील राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारावर नाराज आहेत. भाविक भक्तांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन तातडीने पावले उचलावीत आणि स्वच्छता आणि डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी भाविकांची मागणी आहे.

शासनाचे लाखो रुपये पाण्यात
राज्य शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करुन तुळजापुरात बसस्थानकामध्ये पायाभूत सुविधा दिल्या, मात्र मान्सूनच्या पहिल्याच पावसाचे बसस्थानक हे पाण्याचे डबके बनल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे दिसत आहे. याबाबत नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Back to top button