सोलापूर : योगदिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

सोलापूर : योगदिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : विविध शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटना व नागरिकांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ठिकठिकाणी योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात निरोगी आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मार्गदर्शन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मानवतेसाठी योग’ या विषयावरील योग शिबिराचे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्ताने मंगळवारी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सकाळी सात ते आठ यावेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जागतिक योगदिनाचे हे आठवे वर्ष साजरे करण्यात येत आहे.

योगाचा प्रसार व्हावा म्हणून दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय सोलापूर, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, योग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मानवाच्या निरोगी आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योग म्हणजे थेट परमात्म्याशी जोडले जाणे असे सांगत भारत देश आरोग्यमय होण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योगदिनाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दररोज योगा करावा, असे मार्गदर्शन याप्रसंगी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले आहे.

यावेळी पोलिस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख, माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर हरिभाई प्रशालेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाची सुरुवात शंखध्वनीने झाली. यावेळी शिथिलकरण व्यायाम, विविध योगासने, बैठी आसने, ध्यानधारणा करण्यात आल्या. जैन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलेने सर्वांचे लक्ष तर वेधून घेतलेच; मात्र उपस्थितांना अवाक् केले.

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, विविध आजारांवर योग हे उपयुक्त ठरले आहे. योग म्हणजे केवळ आसन नाही, तर चिंतनमय जीवन जगणे आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात दररोज योग केला पाहिजे असे सांगतानाच महापालिका शाळांमध्ये योग क्लास सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

योगाच्या उपक्रमामध्ये जिल्हााधिकारी कार्यालय, पोलिस आयुक्तालय, जिल्हा परिषद, सोलापूर महानगरपालिका, पोलिस अधीक्षक कार्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, राज्य राखीव पोलिस दल, पोलिस प्रशिक्षण केंद्र, एन.सी.सी. बटालियन 9 व 38, जिल्हा माहिती कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, भारत स्काऊट-गाईड, पतंजली योगपीठ, योग असोसिएशन, दि आर्ट ऑफ लिव्हिंग, विवेकानंद केंद्र, भारतीय योग संस्था, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, गीता परिवार सर्व कल्याण योग, रुद्र अकादमी ऑफ मार्शल आर्ट अँड योग, योग परिषद आणि योग साधना सेवासदन या शहरातील सर्व संस्थांचे सदस्य मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Back to top button