सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकर्यांनी खरीप पिकांची पूर्वतयारी पूर्ण केली होती. मात्र, 8 ते 21 जून याकाळात मृग नक्षत्र कोरडे गेले. याकालावधीत पाऊसच पडला नाही. मृग नक्षत्राचे वाहन हे गाढव असल्याने 'गाढवाने मारली लाथ अन् पावसाने सोडली बळीराजाची साथ', अशी भावना शेतकर्यांत निर्माण होत आहे.
दरवर्षी सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्या मोठ्या जोमाने होतात. सोयाबीन, मूग, उडीद, तूर, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी खरीप हंगामात शेतकर्यांकडून करण्यात येते. यंदाही शेतकर्यांकडून या पिकांची पेरणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
हवामान खात्याने यंदा मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागली. मात्र प्रत्यक्षात नक्षत्रानुसार पावसाळ्याची सुरुवात ही यंदा 8 जूनपासून होती. मृग नक्षत्राच्या पावसाने खरीप पिकांच्या पेरणीचा मार्ग मोकळा होता. त्यामुळे या नक्षत्राच्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी आतुरतेने करत होते. 21 जूनपर्यंत नक्षत्राचा पूर्ण कालावधी संपला तरीही पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्याभरात झाला नसल्याने शेतकर्यांत नाराजी स्पष्ट दिसून येत आहे.
22 जूनपासून आर्द्रा नक्षत्राच्या पावसास सुरुवात होणार आहे. या नक्षत्राचा पाऊस 5 जुलैपर्यंत असणार आहे. या नक्षत्राचे वाहन मेंढा आहे. मेंढा हा शुभ समजण्यात येतो. त्यामुळे मेंंढ्याच्या आगमनाने सरी पडतील व पेरणीचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास आहे. आर्द्रा नक्षत्राच्या कालावधीत पाऊस पडला तरच खरीप पिकांची जोमाने पेरणी होणार आहे. याकालावधीत जर पाऊस पडला नाही, तर खरीप पिकांचे क्षेत्र घटणार आहे.
खते, बियाणे पडून
यंदाच्या खरीप हंगामात बियाणे व खतांची टंचाई निर्माण होत आहे. अशापरिस्थितीत ऐन पेरणीवेळी धांदल नकोच, अशी भूमिका घेत शेतकर्यांनी महागड्या खासगी कंपन्यांचे बियाणे व खते खरेदी केली आहेत. मात्र, पावसानेच ओढ दिल्याने शेतकर्यांनी घेतलेली बियाणे व खते शेतकर्यांच्या गोठ्यात, घरी पडून असल्याचे दिसून येत आहे.