माळीनगर ; पुढारी वृत्तसेवा : पदवीचे शिक्षण चालू असतानाच येथील गार्गी जोशी हिची आंतरराष्ट्रीय कंपनीत मर्चंट नेव्हीत निवड झाली आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी याशिवाय नेव्हीसारखे वेगळे क्षेत्र मुलींनाही करिअरसाठी खुणावतेय, हे गार्गीने तिच्या प्रयत्नातून दाखवून दिले आहे.
गार्गीचे शालेय शिक्षण येथील गुलमोहर इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण धवलनगर येथे झाले. त्यानंतर तिने नेव्हीत जाण्याचे स्वप्न व ध्येय बाळगून बीएस्सी नॉटिकल सायन्सला लोणी काळभोर (जि. पुणे) येथे प्रवेश घेतला. त्यासाठी तिने इंडियन मॅरंटाईन युनिव्हर्सिटीची परीक्षा व वैद्यकीय चाचणी दिली होती.
नॉटिकल सायन्सच्या दुसर्या वर्षात शिक्षण घेत असतानाच तिची सिंगापूरस्थित बगसन वर्ल्डवाईड या गॅस फ्लिटसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. या कंपनीत तिच्या कॉलेजमधील दोन मुलींसह सहाजणांची कंपनीने अंतिम निवड केली. त्यामध्ये गार्गीचा समावेश आहे.
पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ती डेक ऑफिसर म्हणून सेवेत रुजू होणार आहे. इंडियन नेव्हीत लेफ्टनंट कमांडर म्हणून सध्या कर्तव्य बजावत असलेले येथील कौस्तुभ कुलकर्णी यांच्याकडून मुलींसाठी वेगळ्या असलेल्या या अनोख्या क्षेत्रात जाण्याची प्रेरणा मिळाल्याचे गार्गी सांगते. तिचे वडील माळीनगर साखर कारखान्यात काम करतात. गार्गी हिचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.