तुळजापुरात ‘सर्व्हिस रोड’नसल्यामुळे नागरिकांचे बळी | पुढारी

तुळजापुरात ‘सर्व्हिस रोड’नसल्यामुळे नागरिकांचे बळी

तुळजापूर ; पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र असणार्‍या तुळजापूर शहरासाठी राज्य सरकारच्या वतीने शहरांतर्गत सर्व्हिस रोड नियोजित केले आहेत; मात्र विविध कारणांमुळे हे सर्व्हिस रोड अर्धवट राहिले आहेत. सर्व्हिस रोडअभावी या महामार्गावर अनेक अपघात होत असून यात अनेकांचा बळी गेला आहे. सर्व्हिस रोड करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. सर्व्हिस रोड नसल्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात येत आहे.

शहरातील रस्ते होत असताना तुळजापूर विकास प्राधिकरणामधून उस्मानाबाद रोड बसस्थानक आणि नळदुर्ग रोड त्याचबरोबर लातूर रोड या मार्गांवर सर्व्हिस रोडचे नियोजन करण्यात आलेले आहे; परंतु हे सर्व्हिस रोड पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे वाहतूक महामार्गावरुन केली जात आहे. रस्त्यावर चालणारे नागरिक, रिक्षाचालक, दुचाकीस्वार तसेच बाहेरगावाहून येणारे भाविक भक्त यांना चालण्यासाठी सर्व मुख्य रस्त्याच्या बाजूने दुतर्फा सर्व्हिस रोड दिलेले आहेत.

हे सर्व्हिस रोड तातडीने पूर्ण करुन नागरिकांना सुरक्षित चालण्याची संधी उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तुळजापूर नगरपरिषद आणि तुळजापूर विकास प्राधिकरण यांनी शहरातील सर्व सर्व्हिस रोड पूर्ण करावेत, अशी मागणी आहे.

राजकीय हस्तक्षेप आणि हितसंबंध जोपासण्याचा अनुषंगाने प्रमुख मार्गावर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. या अतिक्रमणामुळे आणि रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे जड वाहनचालकांना गाडी चालवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. अतिक्रमण काढल्याशिवाय तुळजापुरातील वाहतूक सुरळीत बनणार नाही आणि लोकांचे मृत्यू होणार नाहीत, अशी भावना व्यक्त होत आहे. तुळजापूर बसस्थानक ते लातूर रोडलक्ष रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड होणे अत्यंत गरजेचे आहे.

येथील सर्व्हिस रोड न झाल्यामुळे या जागेवर अतिक्रमण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय या जागा खासगी लोकांकडून बळकावण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लातूर रोडवरील दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड तातडीने पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी आहे. तुळजापूर विकास प्राधिकरण आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांनी तुळजापूरच्या या रस्ते विकासासाठी लक्ष देण्याची गरज आहे.

शहरात बेशिस्त वाहतूक

तुळजापूर हे राज्यातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. मात्र, शहरात अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात सर्व्हिस रोडअभावी अतिक्रमण होत आहे. शहरातील वाहतूकसेवाही विस्कळीत झाली आहे. अशातच रिक्षा, दुचाकीवाले वाहन व्यवस्थित चालवत नसल्यामुळे अपघातांचा धोका उद्भवू शकतो.

Back to top button