माझ्या जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥ | पुढारी

माझ्या जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥

इ.स. 1680 मध्ये देहू-आळंदीवरून संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी ज्ञानोबा-तुकाराम अशी जोड पालखी सुरू केली. पुढे काही कारणांमुळे इ.स. 1835 च्या सुमारास हैबतबाबांनी ज्ञानेश्‍वर माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरदारांकडे नोकरीला होते. त्यांच्या सेवेत असलेल्या कर्नाटकातील अंकली येथील शितोळे सरकारांनी माऊलींच्या पालखी सोहळ्यास बरीच मदत केली.

त्यामुळे या सोहळ्यांमध्ये शितोळे सरकार व हैबतबाबांचे वंशज आरफळकर पवार यांना विशेष मान आहे. पालखी सोहळ्यातील दोन्ही घोडे, तंबू इ. शितोळे सरकारांचे असतात. पालखी प्रस्थानापूर्वी बारा दिवस आधी अंकलीवरून या घोड्यांचे प्रस्थान होते. तेथे पूजा होऊन हे घोडे प्रस्थानाआधी आळंदी येथे येतात. आळंदीला ज्येष्ठ वद्य अष्टमीला माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते. पालखी प्रस्थानाचा कार्यक्रम दुपारी चार वाजता होतो. प्रस्थान जर गुरुवारी असेल तर मात्र हा कार्यक्रम रात्री होतो. पालखी प्रस्थानानंतर नगरप्रदक्षिणा होऊन पालखी गांधी वाड्यात मुक्‍कामी येते. यालाच भाविक माऊलींचे आजोळघर असे म्हणतात. दुसर्‍या दिवशी सोहळा पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होतो.

पूर्वी माऊलींची पालखी शिरवळमार्गे पंढरपूरला जाई. ज्येष्ठ वद्य एकादशीचा मुक्‍काम संत क्षेत्री असावा, या विचारामुळे पुढे पालखी सासवडमार्गे जाऊ लागली. सकाळी पूजा, सायंकाळी मुक्‍कामी पोहोचल्यावर समाजारती, रात्री कीर्तन व त्यानंतर जागर असा नित्यक्रम असतो. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये नैवेद्य सकाळच्या पूजेच्या वेळेसच होतो. हा नैवेद्य शितोळे सरकार यांच्यातर्फे होतो. पुण्याहून निघाल्यावर वानवडी येथे शिंदेछत्रीजवळ आरती होते. पुणे ते सासवड हा सोहळ्यातील सर्वात मोठा टप्पा. 30 कि.मी.ची वाटचाल, एकादशीचा उपास व घाटाची चढण यामुळे हा टप्पा म्हणजे वारकर्‍यांची कसोटी असते.

घाटामधे रथ ओढण्यासाठी अधिकच्या बैलजोड्या लावाव्या लागतात. जेजुरीमध्ये भंडारा उधळून पालखीचे स्वागत होते. वाल्हे ते लोणंद प्रवासामध्ये नीरा नदीजवळ नीरास्नान होते. पादुका पालखीतून काढून नीरा नदीमध्ये नेतात व श्रींना स्नान घालतात. यावेळेस उपस्थित भाविकसुद्धा देवावर पाणी उडवतात. या सोहळ्यात गोल रिंगण, उभे रिंगण होतात. वाटेमध्ये संत सोपानकाकांची पालखी व माऊली पालखीची भेट होते. याला बंधूभेट असे म्हणतात.

वेळापूरच्या अलीकडे धावा होतो. येथील उतारावरून वारकरी धावत सुटतात. त्यानंतर विसाव्याच्या ठिकाणी शेडगे दिंडीतर्फे भारूडाचा कार्यक्रम होतो. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेली भारूडे अभिनयासह सादर केली जातात. आषाढ वद्य नवमीला माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरजवळील वाखरी मुक्‍कामी असतो. येथे माऊलींसमोर तुकोबांच्या वंशजांचे म्हणजे देहूकरांचे मानाचे कीर्तन होते. दशमीला पालखी सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करतो.

यावेळेस माऊलींच्या स्वागतासाठी पंढरपूरमधून भाटे यांचा रथ येतो. पालखी संस्थानच्या रथामधून काढून पंढरपूरहून स्वागतासाठी आलेल्या भाटे यांच्या रथामध्ये ठेवण्यात येते. हा रथ ओढण्याचा मान वडार समाजाकडे आहे. पालखी सोहळा वाखरी व पंढरपूर यांच्यामधे असलेल्या पादुका मंदिरापाशी आल्यावर सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण होते. त्यानंतर पालखीतील पादुका काढून त्या एका वस्त्रात बांधतात व ते वस्त्र शितोळे सरकारांच्या गळ्यात देतात.

यावेळेस पालखीमध्ये पादुकांचा दुसरा जोड ठेवण्यात येतो. शितोळे सरकारांच्या गळ्यात पादुका, त्यांच्या एका बाजूस वासकर व एका बाजूस हैबतबाबांचे प्रतिनिधी, समोर उजेडासाठी पेटवलेला टेंभा अशाप्रकारे चालत हा सोहळा रात्री उशिरा पंढरपुरात प्रवेश करतो. पंढरपूरमधे पालखीचा मुक्‍काम नाथ चौकाजवळील संत ज्ञानेश्‍वर मंदिरामध्ये असतो. एकादशीला चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिणा होते. पौर्णिमेला गोपाळपूरला काला होतो. त्यानंतर देव भेट होऊन दुपारी पालखीचा परतीचा प्रवास सुरू होतो.

वद्य दशमीला माऊलींची पालखी आळंदीत परत येते. पालखी आळंदीहून निघाल्यापासून परत येईपर्यंत समाधी मंदिरामध्ये रोज चक्रांकित महाराजांचे हरिपाठाच्या अभंगावर कीर्तन होते. पालखी परत आल्यावर चक्रांकित महाराजांतर्फे पिठले-भाकरीचा नैवेद्य होतो व भाविकांना प्रसाद वाटण्यात येतो. दुसर्‍या दिवशी एकादशीला माऊलींची नगरप्रदक्षिणा होते. प्रदक्षिणा मार्गावर मारुती मंदिरात हजेरी होते. यानंतर पालखी सोहळ्याची सांगता होते.

बहुतेक फडकर्‍यांच्या दिंड्या माऊलींच्या पालखीसोबत असतात. या दिंड्यांचा परंपरा पालनावर कटाक्ष व भजनावर निष्ठा असते. उदाहरणार्थ शिरवळकर फडाची दिंडी. ही दिंडी पंढरपूरवरून माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी ज्येष्ठ शु. त्रयोदशीला निघते. 9-10 दिवस प्रवास करून सप्‍तमीला देहूला तुकोबांच्या प्रस्थानाला जाते. तेथून अष्टमीला आळंदीला माऊलींच्या प्रस्थानाला पोहोचते. माऊलींच्या पालखीसोबत पंढरपूरला येते. पुन्हा पंढरपूर वरून परतीच्या प्रवासात माऊलींसोबत असते. आळंदीला पोहोचल्यावर एकादशीला हजेरी होऊन पुन्हा पायी पंढरपूरला जाते. अशाप्रकारे जवळजवळ 56 दिवस, म्हणजे 2 महिने या दिंडीचा प्रवास होतो.

-अभय जगताप

Back to top button