पादचारी पूल बनलेे दारूडे, गर्दुल्यांचे अड्डे ; तर प्रशासनाचे मात्र लाखो रुपये पाण्यात | पुढारी

पादचारी पूल बनलेे दारूडे, गर्दुल्यांचे अड्डे ; तर प्रशासनाचे मात्र लाखो रुपये पाण्यात

सोलापूर :  अमोल व्यवहारे :  सोलापूर ते पुणे महामार्ग ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्रशासनाने लाखो रुपये खर्चून मडकी वस्ती, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि टेंभुर्णी बायपास याठिकाणी पादचारी पुलांची उभारणी केली. हे तीनही पूल नागरिकांसाठी खुलेही करण्यात आले. मात्र हे पूल गर्दुले, जुगारी, दारूड्यांचे अड्डे बनले आहेत. परिणामी या पुलांवरून जाण्यास पादचारी धाडस करीत नाहीत. प्रशासनाचे मात्र लाखो रुपये पाण्यात गेले.

सोलापूर ते पुणे महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूस मडकी वस्ती, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ तसेच टेंभुर्णी बायपास रोडवर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. विद्यापीठ परिसरात तर एका बाजूला विद्यापीठ व दुसर्‍या बाजूला विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. या सर्व ठिकाणी जाण्यासाठी नागरिक, विद्यार्थी महामार्ग ओलांडून प्रवास करतात. त्यामुळे वाहनाची धडक बसून अपघात होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अपघातांतून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

अपघात होतात, जीव जातात आणि त्यानंतर आंदोलने होऊन वाहतूक ठप्प होते. या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत.
महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या लोकांना इकडून तिकडे व तिकडून इकडे करण्यासाठी या महामार्गावर पादचारी पूल असावेत, अशी मागणी जोर धरू लागल्यावर महामार्ग प्राधिकरणाने शहरातील मडकी वस्ती, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि टेंभुर्णी बायपास रोड याठिकाणी लोखंडी पादचारी पूल निर्माण केले.

काही महिन्यांतच या तीनही ठिकाणचे पूल तयारही झाले. नागरिकांसाठी ते खुले करण्यात आले. परंतु आजतागायत या तीनही पुलांचा नागरिकांनी उपयोग केला नसल्याचे दिसून येत आहे.
या पादचारी पुलांवर लाखो रुपयांचा खर्च करताना नागरिकांकडून त्याचा अधिकाअधिक वापर व्हावा, अशी अपेक्षा होती.
मात्र महामार्ग प्रशासनाने याठिकाणच्या नागरिकांशी कसल्याही प्रकारची चर्चा न करता हे पादचारी पूल उभारल्याने नागरिकांकडून या पुलांचा वापरच करण्यात येत नसल्याचे दिसून येते. त्यात भर म्हणून या पुलांवर गर्दुले, जुगारी, दारूडे, टवाळखोरी करणारी मुले यांचे अड्डे बनले आहेत.

लोखंडी बॅरिकेडमधून ये-जा
मडकी वस्ती परिसरात उभारण्यात आलेल्या पुलावरून नागरिकांना त्यांची वाहने घेऊन जाता येत नाहीत. त्यामुळे हे नागरिक त्यांची वाहने जुना पुना नाका येथील नाल्याच्या पुलाखालून चुकीच्या दिशेने घेऊन येतात. अनेकवेळा तर नागरिक हा महामार्ग ओलांडून कडेला असलेल्या लोखंडी बॅरिकेडमधून बाहेर पडतात. त्यामुळे अपघात वाढत आहेत.

Back to top button