उजनी पाईपलाईनच्या कामाची निविदा पुन्हा मागविणार | पुढारी

उजनी पाईपलाईनच्या कामाची निविदा पुन्हा मागविणार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट सिटीचे चेअरमन असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. उजनी दुहेरी पाईपलाईनच्या निविदांत केवळ दोन ठेकेदारांच्या निविदा प्राप्‍त झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा नव्याने यासाठी निविदा मागविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

बैठकीला चेअरमन गुप्ता, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे ऑनलाईन प्रणालीने उपस्थित होते. नियोजन भवन येथे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ, केंद्र सरकारचे प्रतिनिधी पी.सी. धसमाना, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील, मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, शहर अभियंता संदीप कारंजे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

यावेळी गुप्ता यांनी उजनी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. यावेळी गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांच्या त्रिस्तरीय समितीला निर्णय घेण्याचे अधिकारही दिले. एकात्मिक नियंत्रण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून याबाबतची निविदा मंजूर करण्याचा निर्णयही झाला आहे. याबाबतच्या दुरूस्त्या पोललिस आयुक्त, मनपा आयुक्त यांनी 15 जूनपर्यंत कराव्यात, असेही गुप्ता यांनी सांगितले. पार्क स्टेडिअममध्ये अंतर्गत सुधारणा करणे, खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था याबाबतचा एकत्रित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही यावेळी गुप्ता यांनी दिल्या.

…म्हणून निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नियमानुसार किमान तीन ठेकेदार निविदा प्रक्रियेत सामील होणे आवश्यक आहे. मात्र या प्रकल्पाच्या निविदेमध्ये दोन ठेकेदार सामील झाल्याने निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने मागविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Back to top button